ठाणेAmudan chemical blast case : डोंबिवली फेज दोन भागातील एमआयडीसीमध्ये अमुदान कंपनीतील स्फोटातील मुख्य आरोपी मलय प्रदीप मेहतांना (वय 38 वर्षे) 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मेहतांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं ठाण्यातून अटक करून आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयानं त्यांना 29 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या आई मालती मेहता (वय 70) नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक तसंच ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. तर शुक्रवारीच बॉयलर स्फोटप्रकरणी मालती मेहता, त्यांचा मुलगा मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
45 तासांनंतरही शोध मोहिम सुरू :डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत आतापर्यंत मृतांचा आकडा 13 वर गेला असून 65 नागरिक जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून 45 तासांनंतरही शोध मोहिम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण अद्यापही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या भीषण आगीनं अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळं स्फोट प्रकरणातील अरोपींवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.