मुंबई Lalbaugcha Raja : मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेल्या 'लालबागचा राजा'चं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला. दहा दिवसांच्या गणेशोत्वसात लाखो भाविकांनी गणरायांचं दर्शन घेतलं आहे. 'लालबागचा राजा'च्या दरबारात असलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या दान रूपातील पैशाची मोजणी शुक्रवारी पूर्ण झाली असून 7 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरपर्यंत 5 कोटी 65 लाख 90 हजार रोख 'लालबागचा राजा'च्या चरणी भाविकांनी अर्पण केल्याची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी दिली आहे.
लालबागचा राजाला भाविकांचं भरभरुन दान :लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद शुक्रवारी पूर्ण झाली आहे. भाविकांनी गणेशोत्सवातील दहा दिवसात लालबागचा राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रुपये रोख दान केले. भाविकांनी 4 किलो 151.360 ग्राम सोनं आणि 65 किलो 321 ग्राम चांदी अर्पण केली. लालबागचा राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव शनिवार 21 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच आज सायंकाळी सहा वाजता लालबागचा राजाच्या मंडपात आयोजित करण्यात आलेला आहे. 14 सप्टेंबरला शनिवार असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करत उच्चांक गाठला होता. त्यादिवशी 73 लाख 10 हजार रुपये लालबागचा राजाच्या दानपेटीत जमा झाले.