मुंबई Maharashtra Assembly Elections :विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भाजपा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वच राजकीय पक्षांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीला जेमतेम दोन महिन्याचा कालावधी उरलेला असताना राजकीय पक्ष आपली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणार असून जनतेच्या मनातील मतांची चाचपणीसुद्धा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका या निवडणुकीत बसू नये, याकरता महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी विशेष लक्ष दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रचार विधानसभा निवडणुकीत बदलला जाणार आहे. या राजकीय पक्षांच्या यात्रांच गूढ? आहे, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
आता शरद पवारांची शिव स्वराज्य यात्रा :सप्टेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता असून त्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेला जनतेचा कौल विधानसभा निवडणुकीसाठी स्फूर्तीदायक ठरणार आहे. आतापर्यंत शिवछत्रपतींच्या नावावर प्रचाराचा हक्क बजावणारी शिवसेना तसंच भाजपा यांना सोडून यंदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात 'शिव स्वराज्य' यात्रेला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेली शिव स्वराज्य यात्रा संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे. सरकारच्या विविध योजना कशा फसव्या आहेत, हे जनतेला समजावून सांगण्याचं काम या यात्रेतून केलं जात आहे. आपली लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार लाडक्या बहिणीसारख्या योजना आणत आहेत. ज्या बहिणी त्यांना लोकसभेला आठवल्या नाही, त्या आता विधानसभेला आठवणार आहेत. लोकसभेला झालेल्या दारुण पराभव हेच त्याच्या मागचं गमक असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एकंदरीत शिव स्वराज्य यात्रेद्वारे राज्यात सरकारकडून होणारी जनतेची दिशाभूल यावर जास्त प्रमाणात फोकस करणार आहे. दुसरीकडं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय.
अजित पवारांसाठी तारेवरची कसरत :महायुतीत नव्यानं समाविष्ट झालेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यंदा दुहेरी भूमिकेत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रावादी काँग्रेसचा फारसा फायदा महायुतीला झाला नाही. त्या कारणानं अजित पवार यांनी विशेष रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अजित पवार यांनी राज्यात जनसन्मान यात्रा सुरू केलीय. या यात्रेचा शुभारंभ नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरीतून झाला असून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ असा जनसन्मान यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाणार आहे. या यात्रेत समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधला जाणार असून ही यात्रा योजनांपुरती मर्यादीत न राहता समाजातील सर्व समाज घटकांना काय अपेक्षित आहे? त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठा फटका सहन करावा लागलाय. त्या अनुषंगानं भावनिक मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित केलं जात आहे.
काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात :लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास विधानसभेसाठी दुणावला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सुरुवातीला मुंबईतून न्याय यात्रा काढण्याचं ठरवलं असून शनिवार १० ऑगस्टपासून त्याची सुरुवात झाली आहे. सतत १६ दिवस मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ही ‘न्याय यात्रा’ फिरणार आहे. तसंच या न्याय यात्रेमध्ये महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड केला जाणार असून जागोजागी कोपरा सभा सुद्धा घेण्यात येणार आहेत. न्याय यात्रेचं नेतृत्व हे खासदार वर्षा गायकवाड करीत आहे. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, "मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात न्याय यात्रेदरम्यान सभा घेऊन जनतेच्या मूलभूत समस्यांकडं लक्ष वेधलं जाणार आहे. गेली दोन वर्षे मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटण्याचं काम राज्यातलं महायुती सरकार करत आहे. त्यासंदर्भात मुंबईकरांना सविस्तर माहिती देण्यावर यात्रेचा मुख्य भर असणार आहे".