मुंबई : महायुतीचा आज भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदान इथं पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही? याबाबत सस्पेन्स होता. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं.
'शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिलं पाहिजे' :"महायुतीचं सरकार अडीच वर्षांपूर्वी राज्यात आलं. भाजपाचे 105 आमदार असून त्यांनी मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेला अर्थात एकनाथ शिंदेना दिलं होतं. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्याकडं गृहमंत्रीपद होतं. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील, तर आमच्याकडं उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद हे नैसर्गिकरित्या आलं पाहिजे," अशी प्रतिक्रिया "ईटीव्ही भारत"शी बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली. "आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यात योग्य प्रकारे समन्वय आहे. महायुती सरकारनं मागील अडीच वर्षात अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. विकासकामं केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री झाले आहेत. लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्राचे लाडके भाऊ अशी त्यांची ओळख झाली असून, लाडक्या बहिणीनी त्यांना भरभरून मतं दिली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचीही भावना होती की, एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे. परंतु आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत, तर स्वाभाविकपणे आमच्याकडे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रिपद आलं पाहिजे," असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
आमदार - खासदारांकडून एकनाथ शिंदेंवर दबाव ? : महायुतीच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाचे प्रमुख नेते आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यासह बॉलीवूडमधील सेलिब्रिटी हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला काही तासांचा अवधी बाकी असताना, अजूनही एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. बुधवारी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतली. त्यापूर्वी राज्यपालांना भेटून त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सहभागी व्हावं, असं म्हटलं होतं. त्यांना विनंती केली होती. एकनाथ शिंदे हे सकारात्मक प्रतिसाद देतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. परंतु अद्यापपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. शिवसेनेतील आमदार-खासदारांनी एकनाथ शिंदेंवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपद आपल्याकडं असावं, यासाठी दबाव टाकल्याचंही बोललं जात आहे. मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यामुळे आपल्याकडेही स्वाभाविकपणे ही पदं आली पाहिजेत, असा आमदार आणि खासदारांचा सूर आहे. थोडक्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी दोन्ही पदांसाठी आग्रही आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकण्याचाही ते प्रयत्न करत आहेत, असं सर्वसाधारण चित्र शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसत आहे.
हेही वाचा :
- मी पुन्हा आलो. . .; देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, सोहळ्याची जय्यत तयारी
- देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह कायम
- शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाचे घेणार दर्शन