छत्रपती संभाजीनगर : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या जयनगर इथल्या निवासस्थानी आणण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर प्रतापनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना दीर्घ आजार : मागील काही दिवसांपासून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगाव हे आजारी होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही काळापासून नरेंद्र चपळगावकर हे दीर्घ आजाराशी सामना करत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडं असा बराच आप्त परिवार आहे.
मागील काही दिवसांपासून बाबांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. - भक्ती चपळगावकर
नरेंद्र चपळगावकर यांचा जीवनप्रवास : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना छत्रपती संभाजीनगर इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातील साहित्यिक तथा वैचारिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं. नरेंद्र चपळगावकर यांचा जन्म बीड इथं झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण बीड इथच झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण अमरावती आणि तत्कालीन औरंगाबादमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी लातूर इथल्या दयानंद महाविद्यालयात काही काळ मराठीचं अध्यापण केलं. मात्र अध्यापन केल्यानंतर त्यांनी 1962 पासून त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी वकिली क्षेत्रात आपलं नाव केलं. पुढं त्यांनी 1979 साली मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. मुंबईत नरेंद्र चपळगावकर हे नामवंत वकील म्हणून नावारुपास आले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ स्थापन झाल्यानंतर त्यांची खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी 1990 ते 1999 मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
नरेंद्र चपळगावकर यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं साहित्य क्षेत्रातही मोठं योगदान होतं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. यात आठवणीतले दिवस, कहाणी हैदराबाद लढ्याची, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, तुमच्या माझ्या मनातलं, समाज आणि संस्कृती, आदी सुप्रसिद्ध पुस्तकांचा समावेश आहे. साहित्य क्षेत्रात आणि वैचारिक विचारवंतामध्ये नरेंद्र चपळगावकर यांच्याविषयी आदर होता. त्यांची अनेक साहित्यिक आणि सामाजिक संस्थांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. सरस्वतीभूवन शिक्षणसंस्था, पुणे इथल्या इंडियन लॉ सोसायटी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मराठवाडा साहित्य परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, वाई येथील प्राज्ञ पाठशाळा, पुणे इथल्या गोखले अर्थशास्त्र-राज्यशास्त्र संस्था आदींसह अनेक संस्थांचा यात समावेश होता. विशेष म्हणजे वर्धा इथं झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यासह त्यांनी माजलगाव इथं झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. त्यांची तब्बल 36 पुस्तकं प्रकाशित आहेत.
नरेंद्र चपळगावकर यांची प्रकाशित झालेली पुस्तकं खालिलप्रमाणं :
- आठवणीतले दिवस
- कहाणी हैदराबाद लढ्याची
- तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
- मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
- महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
- अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्त्व
- कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
- कायदा आणि माणूस
- तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
- त्यांना समजून घेताना (ललित)
- दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
- नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
- नामदार गोखल्यांचं शहाणपण
- न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
- न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
- राज्यघटनेचे अर्धशतक
- विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन
- संघर्ष आणि शहाणपण
- समाज आणि संस्कृती
- संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
- सावलीचा शोध (सामाजिक)
- हरवलेले स्नेहबंध
हेही वाचा :