मुंबई : आझाद मैदानात राज्याच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता रंगणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच अनेक व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतूक नियमन करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी अनेक मार्ग बंद केले आहेत. अनेक मार्गावरील वाहतूक बंद केल्यानं नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हे मार्ग करण्यात आले बंद :हजारीमल सोमाणी मार्ग, महापालिका मार्ग, प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज, महात्मा गांधी रोड हे महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी कार्यक्रम संपेपर्यंत हे मार्ग बंद राहतील. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. शपथविधी होत असलेले आझाद मैदान हे ठिकाण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मध्य रेल्वेच्या मुख्यालयाजवळ आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेनं येणारे लाखो प्रवासी रेल्वे स्थानकातून निघून इथूनच आपापल्या इच्छित स्थळी जातात. मात्र हे महत्त्वाचे मार्ग शपथविधीसाठी बंद करण्यात आल्यानं, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे. आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्यानं शपथविधीसाठी येणाऱ्या नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असंही आवाहन पोलिसांनी केलं.
शपथविधी कालावधीसाठी बंद असलेले मार्ग व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :
- छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहील.
- महात्मा गांधी रोड बंद राहील- चाफेकर बंधू चौक (ओसीएस जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहील.
- हजारीमल सोमानी मार्ग बंद राहील - चाफेकर बंधू चौक (ओसीएस जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) यादरम्यानची वाहतूक बंद राहील.
- प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज बंद राहील - (मेघदूत ब्रिज) दक्षिण वाहिनी तसेच कोस्टल रोडनं शामलदास गांधी जंक्शनकडं जाणारी वाहतूक बंद राहील.
शिवसेनेने लावले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे बॅनर :महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यावरून एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनिश्चितता आहे. मात्र शपथविधीसाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे अनेक बॅनर शिवसेनेतर्फे मेट्रो सिनेमा परिसरात लावण्यात आले आहेत. शपथविधीसाठी येणारे मान्यवर याच मार्गावरुन प्रवास करणार असल्यानं या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठळक फोटो आहेत. शिंदे महायुती सरकारमध्ये सहभागी होणार का, त्यांना कुठलं मंत्रिपद मिळणार, याबाबत चर्चा रंगली असताना शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावून केलेले स्वागत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. याशिवाय भाजपाच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी विराजमान होत असल्यानं त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स शहरात अनेक ठिकाणी लावले आहेत.
हेही वाचा :
- महायुतीचे सरकार आज होणार स्थापन, शपथविधी सोहळ्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष
- मी पुन्हा आलो. . .; देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, सोहळ्याची जय्यत तयारी
- देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह कायम