मुंबई Devendra Fadnavis :ज्या संसदेचा मार्ग उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातून जातो त्या राज्यातच भाजपाला १८व्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला समोर जावं लागल्यानं या दोन्ही राज्यातील भाजपा नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष करून महाराष्ट्रात भाजपाचा झालेला पराभव हा केंद्रीय नेतृत्वाच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाची सल भरून काढण्यासाठी भाजपा कामाला लागली आहे.
महाविकास आघाडीशी दोन हात :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी हॅट्रिक साधल्या कारणाने देशभरातील भाजपा कार्यकर्ते आणि नेते आनंदात असले तरी महाराष्ट्रात झालेला भाजपाचा दारुण पराभव भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवर घेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय संपादन करण्यासाठी सरकारमधून त्यांना मोकळं करण्याची विनंतीही भाजपा श्रेष्ठींना केली होती; परंतु केंद्रातील तसंच राज्यातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये राहूनच महाविकास आघाडीशी दोन हात करण्याची विनंती केल्यानं अखेर त्यांनी ही विनंती तत्त्वतः मान्य करत येणाऱ्या निवडणुकीला मजबुतीने सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह भरण्याचं काम सुरू केलं आहे. मुंबईत यासाठी वारंवार बैठकांचे सत्र सुरू झालं असून देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना, नेत्यांना मार्गदर्शन करत आहेत.
भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश :महाराष्ट्रातील झालेल्या पराभवाचं विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जरी पराभव झाला असला तरीसुद्धा त्यांच्या मतांची टक्केवारी ही फक्त ०.३ टक्क्यांनी कमी झाली असल्याचं सांगितलं आहे. महाविकास आघाडीला ४३.०९ टक्के तर महायुतीला ४३.०६ टक्के मतं मिळाली. त्याचप्रमाणे मुंबईमध्येसुद्धा त्यांना २६ लाख मतं मिळली. तर महाविकास आघाडीला २४ लाख मतं मिळाली आहेत. परंतु दोन लाख मतं जास्त मिळूनसुद्धा त्यांना फक्त २ जागेवर समाधान मानावं लागलं तर महाविकास आघाडीला ४ जागा मिळाल्या. मुंबईत मिहीर कोटेचा, उज्ज्वल निकम यांचा झालेला पराभव हा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. असं प्राथमिक दृष्ट्या जरी सांगितलं जात असलं तरीसुद्धा मुंबईत आपण किती यशस्वी झालो आहोत याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस हे उदाहरणासह कार्यकर्ते, नेत्यांना पटवून देत आहेत. एक प्रकारे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर हताश आणि नैराश्यात गेलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांना नवीन जोश देण्याचं काम फडणवीस करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर जोपर्यंत पहिला विजय संपादित केला जात नाही तोपर्यंत कुठलाही सत्कार, हार फुले स्वीकारली जाणार नाहीत, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.