महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधकांचा संविधानावर विश्वास नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - MAHAYUTI CABINET EXPANSION

बहुमतानं स्थापन करणाऱ्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. या विस्तारात नागपूरमध्ये महायुतीमधील नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Devendra Fadnavis government Cabinet Expansion
महायुती मंत्रिमंडळ शपथविधी (Source- ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2024, 8:56 AM IST

Updated : Dec 15, 2024, 12:42 PM IST

मुंबई/नागपूर-मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपा गृहनिर्माण मंत्रालय शिवसेनेकडे देईल, अशी शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवसेनेकडून आग्रह करण्यात येणारे गृहमंत्रालय भाजपाकडंच म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं राहणार असल्याची माहिती सूत्रानं दिली.

Live update-

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शपथविधी सोहळ्याकरिता नागपूर विमानतळावर पोहोचले आहेत. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, " ४ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जन्मभूमी आणि कर्मभूमीत आलो आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे. नागपूर हा माझा परिवार आहे". ईव्हीएमवरून आरोप करणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले, "विरोधकांचा संविधानावर विश्वास नाही. आरबीआय, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही. संविधानाला यांनी नाकारले आहे".
  • राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे 9 आमदार शपथ घेणार असल्याची माध्यमांना माहिती दिली.
  • महायुतीच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मात्र, अद्याप शपथविधीसाठी फोन आला नसल्याची माहिती शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी दिली. ते म्हणाले, "मला अद्याप फोन आलेला नाही. पण एकनाथ शिंदे जे जबाबदारी सोपवतील, ते सर्व ती जबाबदारी चोख पार पाडेन. ज्यांना फोन येईल, ते शपथ घेणार आहेत."

मुंबईत एका भव्य समारंभात 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतरही अद्याप महायुतीचे पूर्ण मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही. मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

30- ते 32 आमदार मंत्रिपदाची घेणार शपथ-सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्याकडे असलेली सर्व खाती पूर्वीप्रमाणंच राहणार आहेत. फक्त शिवसेनेकडं यापूर्वी असलेलं गृहमंत्रिपद भाजपाकडे असणार आहे. दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्याकडं मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद येणार असल्यानं त्या बदल्यात एक महत्त्वाचं मंत्रिपद शिवसेनेला दिलं जाऊ शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं अर्थमंत्रिपद कायम राहण्याची शक्यता आहे. नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होताना भाजपा काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करू शकते, असेदेखील सूत्रांनी सांगितले. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वृत्तसंस्थेला सांगितले की, मंत्रिमंडळ शपथविधीत महायुतीचे 30- ते 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 सदस्य असू शकतात.

मंत्रिपदाकरिता काय आहे फॉर्म्यूला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा फॉर्म्यूला तयार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. मात्र, हा फॉर्म्यूला अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. विधानसभेतील जागांनुसार मंत्रिपद दिले जाईल, अशी प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपानं 132 जागांवर विजय मिळविला. शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाला मंत्रिमंडळात 20 ते 21 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिवसेनेला 11 ते 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

  • विधिमंडळाचे आठवडाभर चालणारे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. तर मंत्रिमंडळाचा आज शपथविधी आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

हेही वाचा-

  1. मुहूर्त ठरला...33 वर्षानंतर नागपूरच्या राजभवनात होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी?
  2. शिवसेनेचं बैठकीनंतर ठरलं! महायुतीसोबतच लढणार मुंबई महापालिका निवडणुका
Last Updated : Dec 15, 2024, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details