पुणे Pune Porsche Hit And Run Case :"घटनेमुळं लोकांमध्ये संताप आणि नाराजी पाहायला मिळाली. यामुळे मी पोलीस आयुक्तांकडं घटनेची संपूर्ण माहिती घ्यायला आलो आहे. मी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे. घटनेनंतर पोलिसांनी लगेच कारवाई केली आहे. पोलिसांनी सर्व पुरावे कोर्टात दिले आहेत. प्रकरणाच्या खोलात जाऊन पोलीस तपास करत आहेत," अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Pune Hit Run Case) यांनी दिली.
बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात दाद मागणार :"पुण्यातील हिट अँड रन घटना दुर्देवी आहे. या घटनेमुळं पुण्यात प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. जेव्हा अल्पवयीन आरोपी मुलाला बालहक्क मंडळासमोर हजर करण्यात आलं, त्यावेळी मंडळानं अतिशय नम्र भूमिका घेत आरोपी अल्पवयीन मुलाला 15 दिवस समाजसेवा करण्यास सांगितलं होतं. आरोपीचं वय हे 17 वर्षे आणि 8 महिने आहे. निर्भया प्रकरणानंतर, बाल न्यायप्रणालीत बदल करण्यात आले होते. आरोपीचं वय 16 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोपीला प्रौढ मानले जाऊ शकते. त्यामुळं बालहक्क मंडळानं दिलेला निर्णय हा एक आश्चर्यकारक होता," अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आरोपीवर कलम 304 लावलं : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पोलिसांनी अपघात प्रकरणात योग्य ती कारवाई केली. पोलिसांनी कारवाई करत 304 कलम लावलं आहे. हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्यांचा आहे. त्यामुळं त्याच्यावर वयस्क म्हणून कारवाई करण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी बालहक्क मंडळाकडे करण्यात आली. यापुढची कारवाईदेखील बालहक्क मंडळाच्या सूचनेप्रमाणे करण्यात येत आहे." फडणवीस म्हणाले, " ज्यांनी मद्य दिलं त्यांच्यावरही कारवाई केली आहे. मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्यानं घेतलंय."