नाशिकDevendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना फक्त मी 'गेट वेल सून' एवढंच बोलेन असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप विरोधी पक्ष वारंवार करताहेत. (Maharashtra Crime Rate) राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना उत्तर दिलं. ते आज (10 फेब्रुवारी) नाशिक दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंविषयी मांडलं 'हे' मत :नाशिक शहरात भाजपा आमदारांनी केलेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी तसंच महाराष्ट्र राज्य पोलीस स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आलेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ''उद्धव ठाकरे यांची भाषा, त्यांचे शब्द पाहून माझं ठाम मत झालं आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता मी फक्त 'गेट वेल सून' एवढंच म्हणेल.''
वाढत्या गुन्हेगारीवर काय म्हणाले फडणवीस?राज्यात गुन्हेगारीच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्या गंभीर आहेत; मात्र या घटना व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्यामुळे याचा थेट संबंध राज्याच्या कायदा, सुव्यवस्थेशी येत नाही. ज्या दोन-तीन घटना घडल्या त्यात आणि त्यांच्याशी वैयक्तिक हेवेदावे, भांडणं, व्यवहार आहेत आणि त्याही बाबतीत आम्ही कडक कारवाई करत आहोत, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं.