बारामती (पुणे)Ajit Pawar On Yugendra Pawar: महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बारामतीच्या संस्था शरद पवार यांनी उभ्या केल्या असं सांगणाऱ्या युगेंद्र पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. सगळे त्यांनीच उभे केले मग ३२ वर्षे मी काय करत होतो, असा सवाल अजित पवार यांनी केला. शिवाय त्यांना आतापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याचा टोला पवारांनी लगावला. युगेंद्र पवार यांचा नामोल्लेख न करता ते म्हणाले, मी खासदार झाल्यावर यांचा जन्म झाला आणि हे सांगताहेत की, बारामतीच्या सर्व संस्था शरद पवार यांनी उभ्या केला. मग आम्ही ३०-३२ वर्षे काय केलं, असा सवाल अजित पवार यांनी केला.
युगेंद्र पवार यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप :माळेगाव कारखाना शेंबेकर-जाधवराव या मंडळींनी उभा केला. छत्रपती कारखाना जाचकांनी उभा केला. सोमेश्वर कारखाना मुगुटराव काकडे यांनी उभा केला. बारामती नगरपरिषद १८६२ ला स्थापन झाली. खरेदी-विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती बॅंक पूर्वीपासूनच होती. कृषी विकास प्रतिष्ठान अप्पासाहेब पवार यांनी उभे केले. फक्त दूध संघ शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाला. नंतर १९७२ ला त्यांनी विद्या प्रतिष्ठान स्थापन केले. तेथे १९९१ नंतर मी ट्रस्टी म्हणून गेल्यानंतर आणखी जमीन घेत विस्तार केला. तोवर संस्थेचा विस्तारही झाला नव्हता आणि आमचे चिरंजीव सांगतात की हे साहेबांनी केले, ते साहेबांनी केले. तुम्ही किती धडधडीत खोटे बोलता, तुमचा जन्मही त्यावेळी झाला नव्हता. मग जन्माच्या आधीच तुम्हाला कोणी काय केले, हे माहीत झाले का असा टोला त्यांनी लगावला.
मग मी काटेवाडीत शेती करू का :कुटुंबातील अनेक मुद्द्यांवर अजित पवार यांनी यावेळी माहिती दिली. १९८९ ला काही मंडळी शरद पवार यांच्याकडे गेली. त्यांनी मला लोकसभेची उमेदवारी द्या, असे सांगितले. त्यावर शरद पवार यांनी अजित पवार यांना उमेदवारी देतो आणि मी काटेवाडीत जाऊन शेती करतो, असं उत्तर दिलं. ही मंडळी गप्प थोबाडीत मारल्यासारखी माघारी आली. ती निवडणूक संभाजीराव काकडे विरुद्ध शंकरराव पाटील अशी झाली. आम्ही पाटील यांचं काम केलं अशी आठवण सांगितली. पुढे १९९१ ला सुप्रिया सुळे यांच्या लग्नावेळी काही उद्योगपतींनी तुमच्या कुटुंबातील कोणी तरी राजकारणात असू द्या असं शरद पवार यांना सांगितलं. त्यावेळी मी राजकारणात इच्छुक असल्याने मी पुढे आलो. बाकीचे उद्योग-व्यवसायात गेले. पण आता गेल्या दोन महिन्यांपासून ही मंडळी धंदा पाणी सोडून प्रचारात उतरली आहेत. सुरुवातीचा अपवाद वगळता ते कधी माझ्या प्रचारात दिसले नाहीत, असं अजित पवार म्हणाले.