महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहून...", देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका - Fadnavis on Uddhav Thackeray - FADNAVIS ON UDDHAV THACKERAY

Devendra Fadnavis : आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. "आता सतर्कतेनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे, हे कोणीही विसरू नये, असं ते म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहून खूप वाईट वाटलं", अशी टिप्पणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 9:00 PM IST

अमरावती Devendra Fadnavis :राज्यात नव्या जोमानं मैदानात उतरण्याची गरज आहे. एकजुटीनं मैदानात उतरलो, तर विधानसभेत महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज वरुड येथे पक्षाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यावर निशाना साधला.

देवेंद्र फडणवीस यांचं भाषण (Etv Bharat Reporter)

"खोट बोल पण रेटून बोल" : "महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी निराशा दिसून येतेय. कारण इतक्या कमी जागा मिळतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी जनतेनं नरेंद्र मोदींना मतदान केलं. त्याचबरोबर महाराष्ट्रात आपण कमी पडलो, याची खंतही व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात आमच्या पक्षाची लढाई तीन पक्षांशी नव्हती, चार पक्षांशी होती. चौथ्या पक्षानं खोटं पसरवण्याचं काम केलं. खोटं बोल पण रेटून बोल, अशी विरोधकांची सवय आहे. त्यामुळं त्यांनी सांगितलेलं खोटं लोकांना खरं वाटलं. काही लोक इतके निर्लज्ज आहेत, की त्यांना खोटं बोलल्याशिवाय नाश्ता आणि रात्रीचं जेवण जात नाही. खोट्या बोलण्याला आम्ही प्रभावीपणे खोडून काढू शकलो नाही. राज्यघटना बदलणार, असा चुकीचा समज विरोधकांनी पसरवला". त्यामुळं आम्हाला कमी मते मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्ववादाचा प्रचार केला, पण त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिल्यावर मला खूप वाईट वाटले." - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

केवळ दोन लाख मतांचा फरक :पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदींना मिळालाय. ही खरोखरच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, आपण महाराष्ट्रात मागं राहिलो. आमचे विरोधक खोटे बोलत राहिले. त्यांचा खोटारडेपणा लोकांना खरा वाटू लागला. आम्ही गाफील राहिलो. दोन लाख मतांमुळं त्यांचे तीस तसंच आमचे सतरा खासदार निवडून आले. विरोधकांनी आमच्या विरोधात प्रचंड खोटा प्रचार केला. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्येही त्यांनी असंच केलं होतं. यामुळं आम्ही त्यांच्या खोटेपणाला उत्तर देण्यात कमी पडलो. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला 2 कोटी 48 लाख मतं मिळाली, तर विरोधकांना 2 कोटी पन्नास लाख मतं मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये केवळ दोन लाख मतांचा फरक असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हिंदूंनी जागं होण्याची गरज : "नवनीत राणा यांना माजी खासदार म्हणून संबोधित करताना अतिशय वेदना होतात. खरंतर नवनीत राणा यांच्या पराभवानंतर अमरावतीच्या राजकमल चौकात गोंधळ उडाला होता. आम्ही जाती-धर्माचं राजकारण करीत नाही, मात्र एका विशिष्ट धर्माच्या भरोशावर आपण जिंकू शकतो, अशी भावना आपल्या विरोधकांमध्ये निर्माण झाली, ती घातक आहे. एकूणच अशी सर्व परिस्थिती पाहता आता हिंदूंनी जागृत व्हावं", असं ते म्हणाले.

दलित-आदिवासींचं आरक्षण भाजपामुळं कायम : "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील दलितांना केवळ पन्नास वर्षासाठी आरक्षण मिळावं, असं म्हटलं होतं. 50 वर्षानंतर देशात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपाचं सरकार आलं. त्यावेळी वाजपेयींनी दलित, आदिवासींना आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आता पंतप्रधान मोदी यांनी देखील दलित, आदिवासींचं आरक्षण कधीही हिरावून घेतलं जाणार नाही, असं स्पष्ट केलय. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत भारतीय संविधान देखील कायम असणार, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, विरोधकांनी संविधानासंदर्भात प्रचंड संभ्रम निर्माण केला. याचा फटका आपल्याला बसला", असं त्यांनी सांगितलं.

वैनगंगा-नळगंगा प्रकल्प विदर्भात आणणार समृद्धी :समृद्धी महामार्गामुळं विदर्भाचा विकास आता झपाट्यानं होत आहे. आता वैनगंगा-नळगंगा धरण प्रकल्प हा विदर्भातील सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवणार आहे. अगदी चंद्रपूर गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत कुठंही पाणीटंचाई भासणार नाही, असा दावा त्यांनी केला. या बैठकीला अमरावतीच्या माजी ,खासदार नवनीत राणा, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, निवेदिता चौधरी, किरण पातुरकर. प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते.

'हे' वाचलंत का :

  1. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक, भेटीमागचं 'राज'कारण काय? - Raj Thackeray Meet CM Eknath Shinde
  2. कैदेतील सचिन वाजेला प्रसार माध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी? वाजेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करण्याची कॉंग्रेसची मागणी - Atul Londhe On Sachin Waze
  3. "देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; हायकोर्टाचा निकाल दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप - Anil Deshmukh On Sachin Waze

ABOUT THE AUTHOR

...view details