नवी दिल्ली:महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसनं केली होती,त्यावर निवडणूक आयुक्तांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी पोलीस महासंचालकांची निवडणूक ही युपीएससीच्या माध्यमातून होत असते. त्याशिवाय प्रकाश सिंग यांच्या खटल्यामध्ये यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं त्यावेळी काही निर्देश दिले होते. कोर्टानंच काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यामुळे कोर्टाच्या आदेशांच्या अनुषंगानं जे काही निवडणूक आयोगाला करावं लागेल ते आयोग करेल असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
महाराष्ट्र मोठा असूनही राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दुसरीकडे झारखंड छोटं राज्य असूनही तिथे दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुकीची मागणी केली होती. तर विरोधकांनी जास्त टप्प्यांची मागणी केली होती. सत्ताधाऱ्यांना झुकतं माप नाही का, असा प्रश्न विचारला असता, निवडणूक आयुक्त म्हणाले की, झारखंडमध्ये गेल्यावेळी ५ टप्प्यात मतदान झालं होतं. आता ते फक्त २ टप्प्यात होत आहे. झारखंडमध्ये काही मुद्दे आहेत, ज्यामुळे तिथे दोन टप्प्यात मतदान घ्यावं लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होईल तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात.