पुणे: शहरातील एका नामांकित शाळेत एका 11 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यावर डान्स शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली आहे. पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये असलेल्या नामांकित शाळेतील हा प्रकार असून याबाबत पुण्यातील वारजे पोलिसांनी बुधवारी शिक्षकाला अटक केली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी संस्थाचालकाला देखील अटक केली आहे. अन्वित पाठक असं संस्थाचालकाचं नाव आहे. तर शिक्षकाला 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर संस्थाचालकाला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती, डीसीपी संभाजी कदम यांनी दिली.
काय आहे घटना? : याबाबत अधिक माहिती अशी की, "पुण्यातील कर्वेनगर परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत आरोपी मंगेश साळवे हा डान्स शिक्षक म्हणून कार्यरत होता. शाळेतील मुलांना नृत्य शिकवत असताना हा आरोपी शिक्षक गेल्या दोन वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हात लावत होता. एका ११ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला. त्यानंतर त्याच्या आई वडिलांना याबाबतची माहिती दिली आणि तत्काळ आई-वडिलांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनीसुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षक मंगेश साळवेला अटक केल्याचं संभाजी कदम म्हणाले.