मुंबई : सीबीआय कार्यालयातील ईओबी विभागात डीएसपी पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी आर्थिक चुना लावला. सायबर चोरट्यानं या अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये लंपास केले आहेत. याप्रकरणी तक्रारदार संजय कुमार खुल्लर (वय 59) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणुकीची घटना 26 एप्रिल ते 4 मे दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी दिली आहे. तक्रारदार संजय कुमार खुल्लर हे गेल्या चार वर्षांपासून बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात डीएसपी म्हणून काम करत आहेत.
तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून 25 मिनिटांच्या सुमारास बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात काम करत असताना तक्रारदार संजय कुमार खुल्लर यांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल करून आशिष शर्मा नावाच्या कथित व्यक्तीनं कॉल केला. दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याची बतावणी करून तक्रारदार यांचे नाव आणि आधार कार्ड क्रमांक सांगून पडताळणी करण्यास सांगितलं. नाव आणि आधार कार्ड क्रमांक हा तक्रारदार खुल्लर यांचाच होता. त्यामुळे खुल्लर यांना तो दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचा विश्वास वाटला.
सायबर चोरट्यानं व्हॉट्सअपवरून केला कॉल-समोरून बोलणाऱ्या आशिष शर्मा या कथित व्यक्तीनं अधिकाऱ्याचे पार्सल दिल्ली आयजीआयजीआय एअरपोर्टवर जप्त झाल्याचं सांगितले. पार्सलमध्ये आठ पासपोर्ट, पाच बँक क्रेडिट कार्ड, 170 ग्राम एमडी, चार किलो क्लोन्ज आणि 45 हजार रुपये रोख रक्कम असल्याचं समोरच्या व्यक्तीनं सांगितलं. त्यावर तक्रारदार यांनी ते पार्सल स्वतःचं नसल्याचं सांगितलं. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीकरिता जाळे टाकण्यास पुन्हा सुरुवात केली. तक्रारदार यांच्या व्हाट्सअपवर हॅलो दिल्ली क्राइम ब्रांचअसा मेसेज आला. त्यानंतर व्हाट्सअप मोबाईल क्रमांकावरून त्यांचा कॉल आला. त्यावर दिल्ली पोलीसचा लोगो होता. या आलेल्या कॉलवर सायबर चोरटा हा तक्रारदाराशी एकूण 49 मिनिटे बोलला.