मुंबईFinancial Fraud Mumbai : फिल्म प्रोड्युसर असलेल्या राकेश साकट (वय 52) हे गेल्या वीस वर्षांपासून अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला सर्कल परिसरात राहतात. त्यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर न करूनही त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 50 हजार 300 रुपये डेबिट झाले. याप्रकरणी प्रोड्युसर राकेश साकट यांनी अंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगाराविरोधात भारतीय दंड संविधान कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांनी दिली आहे.
साडेचार लाखाचे ट्रांझेक्शन :फिल्म प्रोड्यूसर राकेश साकट यांना 11 मे रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास जिम वरून राहत्या घरी गेल्यानंतर अचानक मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी आला होता. मात्र तक्रारदार यांनी तो ओटीपी कोणालाही शेअर केलेला नाही. तरीसुद्धा प्रोडूसर साकट यांच्या बँक खात्यातून तीन ट्रांजेक्शन होऊन 4 लाख 50 हजार 300 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे चक्रावून गेलेल्या फिल्म प्रोडूसर यांनी ब्रांच मॅनेजरला कॉल करून झालेल्या ट्रांजेक्शन बाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला; परंतु ब्रांच मॅनेजरने कॉल रिसीव केला नाही.