हैदराबाद- शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांचं व्हॉट्सअप अकांउट हॅक झालं आहे. त्यांच्या अकाउंटवरून जवळच्या व्यक्तींना पैशांची मागणी करण्यात येत आहे.
हर्षल प्रधान यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. व्हॉट्सअपवरून पैसे पाठवा, असे मेसेज पाठविले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही कॉल आणि मेसेजचा रिप्लाय देऊ नये, असे हर्षल प्रधान यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
निष्काळजीपणामुळे हॅकिंग होण्याची शक्यता-व्हॉट्सअॅपचा वापर जवळचे व्यक्ती, नातेवाईक, मित्रवर्तुळ यांच्याशी संपर्कात राहण्याकरिता करण्यात येतो. याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सअप हॅक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. व्हॉट्सअॅप हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असून सुरक्षित असल्याचा मेटा कंपनीकडून दावा करण्यात येतो. तरीही हॅकिंग कसे होते? सायबरतज्ञांच्या माहितीनुसार चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे व्हॉट्सअॅप हॅक होते. हे टाळण्याकरिता काही काळजी घ्यावी लागते.