मुंबई Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) 98वी जयंती आहे. यानिमित्तानं राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर त्यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम घेतले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी 'X'वर पोस्ट शेअर केली आहे.
राज्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत : राजकीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट तसंच शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी स्मृतिस्थळावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा वाद झाला होता. दोन्ही गट आमनेसामने आल्यानं कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे.