बीड :संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपी असलेला कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. 67 दिवस उलटून गेले तरीही कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाही. त्यामुळे न्यायालयानं त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. त्याचे बँक खाते आणि संपत्ती जप्त केल्यानं तो शरण येतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. गेली अनेक दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखा, सीआयडीला गुंगारा देणारा कृष्णा आंधळे हा अजूनही फरार असल्यानं हा निर्णय घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीआयडीनं केली होती न्यायालयात मागणी :संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी आहे. मात्र मागील 67 दिवसांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे. गुन्हे शाखा, सीआयडी आणि विशेष तपास पथक कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत, मात्र तो अद्यापही आढळून आला नाही. त्यामुळे सीआयडीच्या वतीनं न्यायालयात कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सीआयडीच्या या मागणीला ग्राह्य धरत न्यायालयानं कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.