नवी दिल्ली Congress Party New Appointment : काँग्रेस पक्षानं आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. पक्षात नवचैतन्य निर्माण करुन डॅमेज कंट्रोल करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच आता काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे. तर मोहम्मद आरिफ नसिम खान यांना विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांच्यासह सय्यद मुझफ्फर हुसैन यांना महाराष्ट्र प्रदेश समितीचं कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्रात ओळख आहे. अहमनगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात यांचा चांगला दबदबा आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षानं बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी टाकली आहे. बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्यपदावर नियुक्त करण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस पक्षाला नवचैतन्य येण्याची शक्यता आहे. त्यासह अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचं विळ्याभोपळ्याचं सख्य सर्वश्रृत आहे.