जयराम रमेश पत्रपरिषदेत लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना अमरावतीJairam Ramesh On BJP:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये भाजपा दक्षिणेमध्ये पूर्णतः 'ऑफ' असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसंच मध्य भारतातून भाजपा साफ झाली असल्याचं चित्र आहे, असं काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी अमरावती पत्रकारांशी बोलताना म्हटलय.
मोदींमुळे मतदानात निरुत्साह :मतदानाची टक्केवारी यावेळी निश्चितच घसरली आहे. खोटी आश्वासनं देणे, घाबरल्यामुळे 'चारशे पार' सारख्या घोषणा देणे हा सारा प्रकार लोकांना कंटाळवाणा वाटतोय. मोदींच्या अशा वागण्यामुळे मतदारांचा मतदानासाठीचा उत्साह कालच्या मतदानादरम्यान जाणवला नाही. जे काही मतदार मतदानासाठी आले ते सारे मोदींच्या विरोधात आपलं मत देण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचले असल्याचं जयराम रमेश म्हणाले.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, त्यांच्याच सोबत सभा :वर्षभरापूर्वी नांदेडमध्ये पंतप्रधानांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. आज मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये सभा घेत आहेत. हे खरंतर दुर्दैव असल्याचं जयराम रमेश म्हणाले. एअर इंडियामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावेळी उड्डाण मंत्री असणारे प्रफुल पटेल अडचणीत येणार होते. पुढे चौकशी दरम्यान असा कुठलाही घोटाळा झाला नाही, असं स्पष्ट झालं. असं असताना आपली विनाकारण बदनामी झाली याबाबत आज नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेलेले प्रफुल पटेल काही बोलत नाहीत. नरेंद्र मोदी यांना बदनामी करण्यासंदर्भात उत्तर मागण्याचं धाडस पटेल यांनी करायला हवं, असं देखील जयराम रमेश म्हणाले.
युवा आणि महिलांना बनवणार सशक्त :केंद्रात काँग्रेसचं सरकार आल्यावर सर्वांत आधी डिप्लोमा आणि डिग्री घेणाऱ्या युवकांना वर्षभरासाठी एक लाख रुपये मिळतील, अशी व्यवस्था आम्ही करू. भारतातच शिक्षित बेरोजगार असल्याचं देखील जयराम रमेश म्हणाले. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरातील महिलेला वर्षाकाठी एक लाख रुपये मिळतील, अशी व्यवस्था केली जाईल असं देखील जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally
- 'आमच्या आयुष्यातील दहा वर्षे का वाया घालवली', फडणवीसांना उत्तमराव जाणकर यांचा खडा सवाल, शरद पवारांना पाठिंबा जाहीर - Uttamrao Jankar support NCP
- दिव्यांग व्यक्ती काम करत असलेले स्वतंत्र मतदान केंद्र, निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम - Handicapped Voting Centre