मुंबई :Ashok Chavan Political journey : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेली सहा दशकं चव्हाण घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय इतिहासात पिता-पुत्र मुख्यमंत्री होण्याचा मान चव्हाण घराण्याकडे जातो. दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री झाले. अशोकराव चव्हाण यांनीही दोन वेळा राज्याचं नेतृत्व केलं. तसंच, त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळात विविध विभागांचं कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी : अशोकराव चव्हाण यांना समृद्ध असा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांची राजकीय जडणघडण वडिलांच्या संस्कारात झाली. चव्हाण कुटुंबीय हे मूळचं संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील आहे. शंकरराव चव्हाण हे शिक्षण व कामानिमित्तानं नांदेड येथे आले आणि स्थायिक झाले. शंकरराव चव्हाण हे दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. केंद्रातही अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. राज्यातील महत्वाच्या सिंचन प्रकल्पांची उभारणी त्यांच्या काळात झाली आहे. त्यांना आधुनिक भगीरथ म्हणून ओळखलं जातं.
राजकीय कारकीर्द : अशोकराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झाली. पुणे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर ते युवक काँग्रेसच्या माध्यमातून मुख्य प्रवाहातील राजकारणात सक्रिय झाले. 1986 ते 1989 या काळात युवक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलनं केली, अभियान राबवले. त्यानंतर त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक 1987 मध्ये लढवली. या पोटनिवडणुकीत त्यांनी डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. ते वयाच्या तिसाव्या वर्षी खासदार झाले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. जनता दलाचे नवखे उमेदवार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवाची चर्चा राज्यभर झाली होती.
विविध खात्याचे मंत्री : अशोकराव चव्हाण यांची 1992 मध्ये विधान परिषदेवर निवड झाली. ते पहिल्यांदा 1993 मध्ये राज्यमंत्री झाले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांच्यावर 1995 ते 1999 या काळात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती. विधानसभेची पहिली निवडणूक 1999 मध्ये मुदखेड मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले आणि महसूलमंत्री झाले. त्यांनतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला होता. त्यांना परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं होतं. ते पुन्हा 2004 मध्ये मुदखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. आणि राज्य सरकारच्या उद्योग, खणिकर्म, सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार विभागाचे मंत्री झाले.
मोदी लाटेतही निवडून आले : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंबईत अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने 2008 मध्ये अशोकराव चव्हाणांवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळालं. ते भोकर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झाले आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ते निवडून आले होते.
अनेक पदांवर संधी : काँग्रेस पक्षाने अशोकराव चव्हाणांवर 2015 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. ते 2019 मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाले. ते पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार झाले आहेत. सध्या देशपातळीवर काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते सदस्य होते. तसंच, पक्षाने त्यांच्यावर वेळोवेळी जबाबदाऱ्या टाकल्या. गुजरात, आसाम, कर्नाटक, गोवा, तेलंगाणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने त्यांना संधी दिली.