मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा 26 ऑगस्टला अचानक कोसळला. या दुर्घटनेमुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अभियंत्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
पुतळा कोसळल्याचं राजकारण : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसह असंख्य नेत्यांच्या उपस्थितीत डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला हा पुतळा अवघ्या 9 महिन्यांतच म्हणजे 26 ऑगस्टला कोसळला. त्यामुळं त्याला राज्य सरकार पूर्णतः जबाबदार आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आलाय. केतन तिरोडकर यांनी ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली. हा पुतळा घाईघाईत उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यानं आपली कातडी बचावण्यासाठी या पुतळ्याच्या डिझाईनर व स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. पुतळा उभारणाऱ्या नौदल अधिकाऱ्यांना, सा.बां.वि. चे अधिकारी व इतरांना त्यांनी यामधून वगळले. या वादग्रस्त व कातडीबचाव गुन्हा नोंदवण्याच्या प्रकाराबद्दल आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा दावा तिरोडकर यांनी याचिकेत केला.