मुंबई Colaba-Nariman Point Sagari Setu : कुलाबा, कफ परेड ते नरिमन पॉईंट असा कनेक्टर सागरी सेतू बनवण्याचा प्रस्ताव बऱ्याच अवधीपासून प्रलंबित होता. अखेर गुरुवारी या सेतूच्या मार्गाला मान्यता देण्यात आली असून, या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, एमएमआरडीचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या नवीन कनेक्टरमुळं दक्षिणे मुंबईकडील ट्रॅफिकची समस्या सुटायला मदत होणार असून, पर्यटनालासुद्धा चालना मिळण्याबरोबर मुंबईकरांना मनोरंजनाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
स्थानिक मच्छीमारांचा मोठा विरोध : दक्षिण मुंबईतील ट्रॅफिकची समस्या कमी करण्यासाठी नरिमन पॉइंटपासून थेट कुलाब्याला जोडण्यासाठी समुद्रावर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दक्षिण मुंबईत सुमारे 1.6 किमी लांबीचा पूल उभारण्यात येणार होता. सन 2021 पर्यंत पुलाच्या बांधकामाशी संबंधित सर्वेक्षणाचे सर्व काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. पण नंतरच्या काळात स्थानिक मच्छीमारांचा मोठा विरोध या प्रकल्पाला असल्यानं हा प्रस्ताव रद्द झाला. परंतु, आता मच्छिमारांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना त्रास होऊ नये यासाठी नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे.
मरीना, एंटरटेनमेंट झोन निर्माण करणार : या कनेक्टर रोडबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष व कुलाबा मतदार संघाचे आमदार राहुल नार्वेकर म्हणाले की, "मुंबईतील ट्राफिक कोंडी दूर करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोस्टल रोड निर्माण केला, जो मरीन ड्राईव्ह येथे सुरू होऊन पुन्हा तिथेच संपतो. असं असताना दक्षिणेकडे जाणारी जी वाहनं आहेत, त्यांना सुरळीत जाण्यासाठी कुलाबा, कफ परेड ते नरिमन पॉईंट एक कनेक्टर प्रस्तावित होता. परंतु, या कनेक्टर ब्रिजमुळं मच्छीमारांचे फार मोठं नुकसान होणार होतं. कुलाबा, कफ परेड येथील मच्छीमारांनी याचा विरोध केला होता. त्या अनुषंगानं मच्छीमारांचे नुकसान होऊ नये म्हणून आता हा कोस्टल रोड एनसीपीएकडून लेफ्ट घेऊन आपण किनार्याकडून काढत आहोत. त्यामुळे ट्रॅफिकची समस्यासुद्धा दूर होईल व मच्छीमारांचेसुद्धा नुकसान होणार नाही. या प्रकल्पाला मान्यता प्राप्त झाली असून, त्यात आपण मरीना, एंटरटेनमेंट झोन निर्माण करणार आहोत. त्याचबरोबर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना, मुंबईतील सामान्य माणसांना मनोरंजनाचे अधिक साधन या मरीना व मुंबई कोस्टल रोडमुळे उपलब्ध होईल."
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी : आता नवीन प्रस्तावानुसार नरीमन पॉईंट येथील एनसीपीए किनाऱ्यालगत बुधवार पार्क मार्गे येथून जाणारा रस्ता तयार केला जाणार असून या रस्त्याला लागून मत्स्यालयसुद्धा विकसित केले जाणार आहे. या पुलाला एकूण 4 लेन असणार असून, 2 लेन नरीमन पॉईंट आणि 2 लेन कुलाबाकडं जाणाऱ्या गाड्यांसाठी असणार आहेत. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी संरक्षण आणि पर्यावरण विभागाकडून परवाना मिळण्याचे फार मोठे आव्हान होते. नौदल आणि तटरक्षक दलाच्या अनेक महत्त्वाच्या तळांवरून हा पूल जाणार असल्यामुळं या विभागांकडून परवाना मिळण्याची आवश्यकता होती, असंही सरकारकडून सांगण्यात आलं.
हेही वाचा -"नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार"; अटल सेतू कामाच्या दर्जावरुन नाना पटोलेंची टीका, सेतूची केली पाहणी - Nana Patole on Atal Setu