मुंबई Salman Khan House Firing Case :हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट समोर गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात आणि देशातील चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुंबई पोलिसांनी दमदार कामगिरी करत गोळीबार करणाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज अभिनेता सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. भेटीवेळी सलमान खान याचे वडील, ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हे देखील उपस्थित होते.
सलमान सोबत आहोत: भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सलमान खानची आत्ताच भेट घेतली असून ही सदिच्छा भेट होती. गॅलेक्सी अपार्टमेंट समोर फायरिंग करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी बिहार येथील रहिवासी असून पोलिसांनी 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतली आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असून चौकशीच्या माध्यमातून सर्व सत्य बाहेरील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय. तसंच मुळापर्यंत जाऊन चौकशी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्यात. या घटनेमागे कोण आहे याची चौकशी करून पोलीस कठोर कारवाई करतील. यापुढं अशा प्रकारची हिंमत कोणी करता कामा नये अशा प्रकारची जरब पोलीस त्यांच्यावर बसवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.