नाशिक/अहमदनगर Eknath Shinde :जिल्ह्यातील शहापंचाळे येथे सुरू असलेल्या प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या महाराजांच्या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी महंत रामगिरी महाराज यांचं कौतुक करत संतांच्या केसालाही धक्का लागणार नसल्याचं वक्तव्य केलंय. "राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. राज्यातील संत परंपरा मोठी आहे. संतांच्या आशीर्वादानं राज्य चालू आहे. त्यामुळं या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
80 लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा :"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 80 लाख भगिनींच्या खात्यात जमा झाले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत महिलांच्या खात्यात दीड कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहेत. उर्वरित भगिनींच्या खात्यात टप्प्याटप्प्यानं रक्कम जमा केली जाईल," असंही मुख्यमंत्री म्हणाले. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना अखंडपणे सुरू राहणार आहे. आम्ही लाडकी बहिण, लाडका भाऊ अशा योजना राबवत आहोत. मात्र जनतेची दिशाभूल करत विरोधक या योजनांच्या विरोधात न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयानं त्यांना तोंडावर पाडलंय. न्यायालयात जाऊन विरोधकांनी पाप केलंय. मी तसंच आमचे दोन उपमुख्यमंत्री सर्व राज्यातील भगिनींच्या पाठीशी आहोत. राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.