मुंबई Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी भारतानं आणखी एका पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सुपुत्रानं कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये नेमबाज स्वप्नील कुसाळेनं कांस्यपदकाची कमाई केली. यानंतर स्वप्नीलच्या या चमकदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही स्वप्नील कुसाळे आणि त्याच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे. तसंच ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला मुख्यमंत्र्यांकडून 1 कोटीचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाना फोन करत त्यांचं अभिनंदन केलं.
मुख्यमंत्री शिंदेंनी केलं अभिनंदन : पॅरिस इथं सुरु असलेल्या ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या स्वप्नील कुसाळेचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राज्य सरकारच्या वतीनं त्याचं अभिनंदन करण्यात आलं असून त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. स्वप्नीलमुळं कुस्तीमध्ये भारतासाठी वयक्तिक पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचं स्मरण झालं. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलनं महाराष्ट्रासाठी हे पदक पटकावलं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खडतर मेहनत घेऊन त्यानं हे यश संपादन केलं. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलनं कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलनं आपलं राज्य आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवलं असं म्हणत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.