महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"घरात बसून काहीही होत नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde : स्वच्छ भारत अभियानातून काय साध्य होणार म्हणून पंतप्रधानांवर टीका करणारे घरात बसून सरकार चालवित होते. सरकार लोकाभिमुख होण्यासाठी घरात बसून काहीही होत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. लोकांशी संवाद साधावा लागतो. मगरीचे अश्रू ढाळून उपयोग नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांच्यावर ठाणे येथे केली.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 10:48 PM IST

Updated : Mar 3, 2024, 10:54 PM IST

ठाणे CM Eknath Shinde : महायुतीच्या सरकारनं मागील पावणेदोन वर्षांत केंद्र, राज्य शासनाच्या अनेक योजना राबवून त्याचा थेट लाभ सामान्यांना मिळवून दिला. स्वच्छता, आरोग्य अशा अनेक योजनांमध्ये महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य झालं. घरात बसून नाही तर, महायुतीचे सरकार जनतेच्या दारात जाऊन काम करत आहे. त्यामुळं सामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (3 मार्च) 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात करत उध्दव ठाकरेंचा समाचार घेतला.

विकासकामाचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकासकामांचं लोकार्पण :जिल्हा प्रशासनानं 'शासन आपल्या दारी' उपक्रम डोंबिवली जवळील कोळे गावातील प्रीमिअर मैदानावर आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या ग्रामीण, शहरी भागातून सुमारे लाखाहून अधिक नागरिक, लाभार्थी, मंत्रिगण उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक विकास कामांचे, कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रम प्रत्यक्ष आणि काही ऑनलाईन माध्यमातून करण्यात आला. अनेक लाभार्थींना त्यांच्या लाभाची सुविधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली.


लोकांच्या दारात योजना नेल्या :यापूर्वीच्या अडीच वर्षांतील सरकार घरात बसून दूरदृश्य प्रणालीव्दारे लोकांशी संवाद साधत होते. त्यामुळे शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचत नव्हत्या. गेल्या पावणे दोन वर्षांत महायुतीचे सरकार राज्यात आल्यापासून हे सामान्यांचं सरकार आहे, अशा पध्दतीनं आमचं सरकार काम करत आहे. केंद्र, राज्य शासनाच्या अनेक योजना सामान्यांपर्यंत त्यांच्या घराच्या दारात पोहचविल्या जात आहेत. आम्ही सामान्य जनता हा घटक विचारात घेऊन लोकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून त्यांच्या दारात योजना नेल्या. लोकांच्या जीवनात यामुळे आमुलाग्र बदल घडत आहेत. घरात बसून नव्हे तर लोकांच्या दारात गेल्यानं हे शक्य झालं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

२५ हजार लाभार्थींना थेट लाभ :शासनाच्या योजना लोकांच्या दारापर्यंत गेल्या पाहिजेत म्हणून खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभर शासन आपल्या दारी उपक्रम २२ ठिकाणी राबविण्यात आला. केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा चार कोटीहून अधिक लाभार्थींनी लाभ घेतला. ४५ लाखाहून अधिक जणांनी लाभासाठी नोंदणी केली. २५ हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. या योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळाली. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. ठाणे जिल्ह्यातून या योजनेला मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं.

ठाकरे काळातील रखडलेले प्रकल्प शिंदे काळात सुरू:मागील अडीच वर्षांत स्वत:च्या स्वार्थासाठी आणि अहंकारामुळे ठाकरे सरकारनं सर्व प्रकल्प रोखून धरले होते. महायुतीचे सरकार राज्यात येताच हे सर्व प्रकल्प सुरू करण्यात आले. आजची लाभार्थींची गर्दी ही सरकार पडण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठी चपराक आहे. कल्याण तळोजा मेट्रो मार्गाने नवी मुंबई इतर शहरांशी जोडली जाणार आहे. नवी मुंबई परिसरातील १४ गावे पालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


रुग्णांची गैरसोय दूर करण्याचा सरकार प्रयत्न करणार:कर्करोगाचं निदान झाल्यानंतर अनेक रुग्ण, त्यांचे कुटुंब अत्यवस्थ होतात. उपचारासाठी त्यांना मुंंबई परिसरात जावे लागते. रुग्ण, नातेवाईकांची ही गैरसोय विचारात घेऊन खासदार शिंदे यांच्या प्रयत्नानं डोंबिवलीत कर्करोग रुग्णालय, त्याच जागेत सुतिकागृहाची उभारणी केली जात आहे. ठाणे जिल्ह्याच्या नागरीकरण होत असलेल्या अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कळवा शहरांमध्ये अद्ययावत वैद्यकीय सुविधा देऊन नागरिकांची, रुग्णांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सरकार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.



वैद्यकीय सुविधा आणि इतर विकास प्रकल्पांचे भूमिपूजन:कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे डोंबिवलीत टिळक रस्त्यावर २०० खाटांचे सुतिकागृह आणि कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे. मागील १० वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यानं आकाराला येणार आहे. या प्रकल्पासह मासळी बाजार, शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा आणि इतर विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभुराजे देसाई, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ७०० ठिकाणे सुरू करण्यात आला आहेत. १५० हून अधिक वैद्यकीय उपचार या माध्यमातून मोफत केले जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची खर्चाची तरतूद दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. लाच प्रकरणात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापकाला सीबीआयनं नागपुरातून केली अटक
  2. शेतकऱ्यांचा मागं न हटण्याचा निर्धार; 'या' तारखेला करणार दिल्लीकडं कूच
  3. ठरलं! महाविकास आघाडीची यादी 'या' तारखेला होणार जाहीर; 19 ते 20 जागा काँग्रेस लढवणार
Last Updated : Mar 3, 2024, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details