मुंबई CM Eknath Shinde:'इंडिया' आघाडीची मुंबईत जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना 'तमाम हिंदू बांधव' असा उल्लेख केला नाही. त्यामुळं आता यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. तसंच इंडिया आघाडीच्या सभेतील भाषणातून केवळ व्यक्तीद्वेष दिसला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राहुल गांधींवर टीका :'इंडिया' आघाडीच्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते पंतप्रधानांचा व्यक्तिद्वेष करत आहेत, त्यांना ते शक्ती म्हणत असले तरी त्यांना वास्तविक हिंदुत्वाची शक्ती म्हणायचं आहे. हिंदुत्वाची शक्ती संपवणारा अजून कोणी जन्माला आला नाही, असं मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले.
फारुख अब्दुल्लांसोबत बसताना लाज वाटली नाही का? : "ज्या मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांना शिवसेनेनं सातत्यानं विरोधक मानलं, त्या अब्दुल्ला यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसताना यांचे हिंदुत्व कुठे गेले? यांना लाज वाटली नाही का?" असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलाय. "त्यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली म्हणूनच आम्ही त्यांना सोडले. त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा सोडली आहे, आता ते 'गर्व से कहो हम हिंदू है' असं म्हणू शकतात का?" असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. "आता माझ्या 'तमाम हिंदू बांधवांनो' हा शब्दसुद्धा कालपासून बंद झालेला आहे. त्यांनी सर्व हिंदू बांधवांचा अपमान केलाय. त्यांनी सर्वांची माफी मागायला पाहिजे," असेही मुख्यमंत्री म्हणाले. "अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी आपण काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा विचार करत होतो मात्र जर त्याला फारूक अब्दुल्ला विरोध करत असतील तर त्यांची वृत्ती काय आहे ते समजून येते," असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.
विरोधकांकडं पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही : "शिवाजी पार्कवर जमलेले सर्व नेते आणि त्यांचे पक्ष हे निराशेने ग्रासलेले आहेत. त्यांच्यात जराही हिंमत आणि आत्मविश्वास नाही. अशा लोकांना घेऊन हे काय लढणार? राजाचा जीव 'ईव्हीएम'मध्ये आहे, असे विरोधक म्हणताना त्यांनी आपला पराभव आताच मान्य केलाय, हे स्पष्ट होतं," असं मुख्यमंत्री म्हणाले.