मुंबई :आपल्याकडं एक उपरोधिक म्हण आहे, सरकारी काम आणि दहा महिने थांब. कोणत्याही छोट्यात छोट्या शासकीय कामासाठी जाणारा प्रचंड कालावधी, हेलपाटे मारणे यातून ही म्हण जन्माला आली. मात्र, आता लोकांचे हेलपाटे लवकरच बंद होणार आहेत. कोणत्याही नोंदणीच्या कामासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात वारंवार जावं लागते. त्यात जाणारा वेळ वाचावा यासाठी 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली आहे.
आता घरबसल्या करा दस्त नोंदणी :याबाबत अधिकची माहिती अशी की, "कोणत्याही दुय्यम निबंध कार्यालयात दस्त नोंदणी करण्याकरता 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' ही संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेमुळे नागरिकांना आता घरबसल्या दस्त नोंदणी करता येणार आहे. सोबतच महसूल विषयक दस्त नोंदणी करता फेसलेस प्रणाली देखील राबवली जाणार आहे," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. "यासाठी पुढील शंभर दिवसांचा आराखडा तयार केला जात असून, महसूल विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत बैठक घेण्यात आली," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.