ठाणे Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण वेगानं पुढं सरकताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडं सोपवण्यात आलाय. तपास सोपवण्यात आल्यानंतर सीआयडी पथक तातडीनं कामाला लागलंय. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मंगळवारी एसआयटी आणि सीआयडीचे पथक मुंब्रा येथील घटनास्थळी दाखल झालं. ज्या ठिकाणी चकमक झाली त्या ठिकाणी एसआयटी आणि सीआयडी पथक तपास करत आहे.
सीआयडी आणि एसआयटी चौकशीचा ससेमिरा : मंगळवारी एसआयटी पथकानं मुंब्रा येथील घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी व्हॅनमध्ये चार राउंडच्या पुंगळ्या सापडल्या. सीआयडीचे पथक दुपारी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालं होतं. त्यामुळं आता या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्याचं स्पष्ट झालं.
गोळीबाराचा आवाज आला नाही? :राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्यानं सोमवारी घडलेल्या या घटनेचा गंभीर परिणाम होऊन नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळं विविध चर्चा रंगत आहेत. मुंब्रा बायपासवर सोमवारी सायंकाळी झालेला एन्काऊंटर वादाच्या भोवऱ्यात सापडला. यात एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपी अक्षय शिंदेनं एक राऊंड फायर केली. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस अधिकाऱ्यानं अक्षय शिंदेच्या दिशेनं एक राऊंड फायर केला. यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. ही घटना मुंब्रा बायपासवर घडली. मात्र, गोळीबाराचा आवाज आसपासच्या लोकांना ऐकू आला नाही. त्यामुळं या घटनेमागचं नेमकं सत्य काय? याबाबत मुंब्रावासीयांमध्ये चर्चा सुरू होती.
एसआयटी पथकाची स्थापना आणि कारवाई : बदलापूर परिसरात घडलेली अत्याचाराची घटना, गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब, बदलापुरातील आंदोलन या सर्व प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली होती. याच पथकातील संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडली. अक्षय शिंदेनं केलेल्या गोळीबारात सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळीबार केला, त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.