मुंबई Coastal Road Water Leakage:मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या अंडरपासमध्ये गळती सुरू झाल्यानं महापालिकासह कोस्टल रोडचे कंत्राटी अधिकारी अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कोस्टल रोडची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर बोलताना ते म्हणाले की, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून भविष्यात अशा घटना घडू नयेत याकडेही लक्ष देण्यात आलं आहे.
इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊटिंग ही प्रक्रिया :मुंबई महापालिकेनं 14 हजार कोटी रुपये खर्च करून 10 किलोमीटरचा कोस्टल रोड तयार केला आहे. या प्रकल्पात 2 किमीचे 2 बोगदे सुरू करण्यात आले असून, त्यापैकी वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिका सुरू करण्यात आली आहे. या मार्गिकेमधील एका बोगद्यातील जॉइंटमधून पाणी गळत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना घेऊन परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोस्टल रोड सबवेमध्ये पाण्याची गळती सुरू झाल्याचं लक्षात आल्यानंतर मी तातडीनं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाचे प्रमुख अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त, इलेक्ट्रिकचं पथक घटनास्थळी पाठवलं. आज मी इथे आलो आहे. येथे दोन-तीन भिंतींमध्ये पाण्याची गळती सुरू आहे. तसंच या भुयारी मार्ग तज्ञाची भेट घेतली आहे. दोन-तीन सांध्यांमधून पाणी गळती होत असली तरी दोन्ही बाजूला असे एकूण 50 सांधे आहेत. या 50 सांध्यांमध्ये, तज्ञांनी इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंगची प्रक्रिया करण्यास सांगितलं. या कामासाठी विशेष तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. जे भुयारी मार्ग तज्ञ आहेत त्यांचीही मदत घेतली जाणार आहे. तात्पुरत्या उपायाऐवजी कायमस्वरूपी उपाय योजला जात आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.