मुंबई :नागपुरात 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पडलं. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीचा सोहळा पार पडला. त्याआधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरून महायुतीत नाव निश्चित होत नसल्यामुळं शपथविधी लांबणीवर गेला. तसेच महायुतीत कोणाला कोणती खाती द्यायची? आणि कोणाला मंत्री करायचे? यावरूनही एकमत होत नसल्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी लांबणीवर गेल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आता मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, मंत्र्यांना बंगले आणि फ्लॅट देण्यात आले आहेत. परंतु हे सर्व होऊनही अद्यापपर्यंत महायुतीतील अनेक मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळं पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांनी आज किंवा उद्या पदभार स्वीकारा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य कृती आराखडा :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यावेळी त्यांनी आपण शंभर दिवसाचा विकास आराखडा तयार करण्याचं म्हटलं होतं. यानंतर मुख्यमंत्री जोरात कामाला लागले असताना मंत्री मात्र सत्कार समारंभ आणि हारतुरे यात व्यग्र आहेत. तर काही मंत्री परदेश दौऱ्यावर विश्रांती घेत आहेत. मागील आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं. एक आठवड्याचा दुखवटा पाळण्यात आला. यामुळे काही मंत्र्यांना पदभार स्वीकारलेला नव्हता. परंतु आता मंत्रिपदाचा पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांनी एक किंवा दोन जानेवारीला पदभार स्वीकारावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांना 100 दिवसाचा रोड मॅप तयार करायचा आहे. झालेल्या विकासकामांचा 100 दिवसाचा कृती आराखडा बनवायचा आहे. या 100 दिवसात प्रत्येक खात्याचा संबंधित मंत्र्याकडून 100 दिवसाचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. म्हणून या कृती आराखड्यासाठी आपण लवकरच कामाला लागले पाहिजे. यामुळं मंत्रिपदाचा पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांनी लवकरच पदभार स्वीकारून कामाला लागावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बंगल्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य :एकीकडं मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधी, खातेवाटप, मंत्र्यांना दालन आणि बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना बंगले न मिळाल्यामुळं त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना राहण्यास साधा फ्लॅट देण्यात आला आहे. आम्ही फ्लॅटमध्ये का राहायचं? आम्हाला राहण्यास बंगले हवे होते. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या मंत्र्यांना बंगले दिलेत. मात्र आम्हाला फ्लॅट दिलेत. असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कारणामुळेच शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नसल्याची चर्चा आहे. तर काही मंत्र्यांना मनासारखं खातं न मिळाल्यामुळं मनासारखं दालन आणि बंगला न मिळाल्यामुळं देखील त्यांनी अद्यापपर्यंत मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.