पुणेLok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडूनही तयारीचा आढवा घेण्यात येत आहे. या आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. ते आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
घरी बसून करता येणार मतदान : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात कधीही लागू शकते. त्या अगोदरच आता राज्य निवडणूक आयोगानं आढावा घेण्यास सुरुवात केलीय. त्याचं अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितलं की, व्हिडिओ रेकॉर्डसह घरी बसून दिव्यांग, 80 वर्षाच्या वरील नागरिकांना मतदान करता येणार आहे. यावर्षीपासून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतल्याचं श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील. निवडणूकीची पूर्वतयारी दीड दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे.आता जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयाला भेटी देण्याचं काम सुरू आहे. आज पुण्यात पहिली बैठक झाली असून निवडणूक आढावा बैठक घेतली.- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी
घरपोच 12D फॉर्म उपलब्ध :आगामी निवडणुकीत काही धोरणात्मक बदल करण्यात आल्याचंही श्रीकांत देशपांडे म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच 80 वर्षांवरील दिव्यांगांना घरबसल्या मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर, लोकांना त्यांचे पर्याय निवडण्यासाठी 12D फॉर्म उपलब्ध होतील. त्यांना घरपोच फॉर्म दिला जाईल. त्यांच्याकडून पर्याय घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाईल. मतदान होण्यापूर्वी त्यांची मतं घेतली जातील.
कसबा पोटनिवडणुकीत घरी बसून मतदान : "आम्ही ज्येष्ठांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येण्याची विनंती करणार आहोत. त्यामुळं त्यांना पाहून लोक मतदानासाठी बाहेर पडतील, असं देशपांडे यांनी सांगितलं. तसंच, घरी बसून मतदान करण्याचा प्रयोग कसबा पोटनिवडणूकीत झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे घरी बसून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मतदान करणं शक्य होणार आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का :
- शून्यातून विश्व निर्माण करून वडिलांच्या पायी ठेवेल, तीच माझी सेवा असेल-सुप्रिया सुळे
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नवीन चिन्हावर रणशिंग फुंकणार; महाराष्ट्रात तुतारी वाजणार का? काय आहेत शक्यता?
- "येणाऱ्या काळात एकट्याची... "; पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?