मुंबई ECI Team Maharashtra Visit : आगामी विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला. ते शुक्रवारी मुंबईत बैठकीत बोलत होते.
मुंबईत बैठक पडली पार :राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह आयोगाच्या दोन सदस्यांनी राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी केंद्रीय निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, दुसरे निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप बैठकीला उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना सूचना :लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मतदारांना अडचणींचा सामना करावा लागला होता. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी देखील नाराजी व्यक्त केली होती. कोणतीही सूचना न देता मतदार यादीतून नाव गायब झाली होती. मतदान केंद्र बदलल्यामुळे अनेकांना निराश होऊन घरी जावं लागलं होतं. तसंच मतदानासाठी तासंतास रांगेत उभं राहावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर राजीव कुमार यांनी या आढावा बैठकीला उपस्थित असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित यंत्रणेमार्फत आयोगाने दिलेल्या सूचनानुसार मतदारांना सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश दिले.
गैरप्रकार रोखा : लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशाचा गैरवापर व मोफत वस्तू वाटपाच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळं असे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करायला हव्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत तत्काळ कारवाई करा, असे आदेशही राजीव कुमार यांनी दिले. तसंच सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती या बैठकीत दिली.
हेही वाचा -
- मुंबई विद्यापीठ सिनेटवर युवासेनेचाच झेंडा, 10 पैकी 8 जागांवर ठाकरेंचाच विजय - Mumbai University Senate Election
- विधानसभा निवडणूक 2024: एकनाथ शिंदेंची शिवसेना ठाकरेंचा 'मुंबई' बालेकिल्ला करणार काबिज ? जाणून घ्या शिंदे गटाचं टार्गेट काय? - Assembly Election 2024
- आगामी विधानसभा निवडणूक 2024 फक्त देवेंद्र फडणवीस नव्हे, तर 'या' नेत्यांच्या नेतृत्वात लढवणार भाजपा - Assembly Election 2024