छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा परिसरात एसबीआय बँकेचं एटीएम गॅस कटरनं फोडल्यामुळं दहा ते पंधरा लाख रुपये जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दोन चोरट्यांनी गॅस कटरनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असताना गॅस कटरमुळं एटीएमला आग लागली आणि या आगीत दहा ते पंधरा लाख जळून खाक झाले. त्यावेळी चोरट्यानं एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही फोडण्याचा देखील प्रयत्न केला. तेव्हा बाजूला असलेल्या व्यक्तींना जाग आल्यानं चोरट्यांनी गॅस कटर मशीन एटीएममध्ये सोडून फरार झाले. सोमवारी रात्री साडेचार वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असून, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दहा ते पंधरा लाख जळून खाक : गेल्या काही दिवसांपासून बँकांचे एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. शहरातील पडेगाव आणि छावणी भागात अशा काही घटना घडल्या आहेत. त्यात आता गॅस करटनं मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना माळीवाडा परिसरात झाली. सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास माळीवाडा येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये काही तरी गडबड असल्याचं बाजूला असलेल्या एका व्यक्तीला आढळून आलं. त्यानं तिकडं धाव घेतली असता तिथं दोन चोरटे एटीएम मशीन कटरनं फोडत असल्याचं दिसलं. सदरील व्यक्ती पाहताच दोन्ही चोरट्यांनी तिथून पळ काढला. गॅस कटरनं मशीन फोडत असताना, कटरमधून निघालेल्या आगीमुळं मशीनमध्ये असलेल्या नोटांना आग लागली. त्यात दहा ते पंधरा लाखांची रोख जाळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.