महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छगन भुजबळ नक्की अधिवेशनात सहभागी होतील सुनिल तटकरे यांची माहिती; भुजबळ यांची हजेरी पण... - CHHAGAN BHUJBAL

शिर्डीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नक्की सहभागी होतील अशी आशा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

सुनिल तटकरे आणि इतर
सुनिल तटकरे आणि इतर (Etv Bharat reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2025, 12:42 PM IST

Updated : Jan 18, 2025, 12:59 PM IST

शिर्डी - दिशा विकासाची पुरोगामी विचाराची हे ब्रीद वाक्य घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साईनगरीत दोन दिवस नवसंकल्प शिबीर होत आहे. विधानसभेतील अभूतपूर्व यशानंतर आता पुढील वर्षात तसंच आगामी पाच वर्षात पक्ष संघटन मजबूत करणे, पक्षात शिस्त आणणे, नवे संकल्प निश्चित करणे आणि त्या संदर्भात पक्षाचे, विकासाचे धोरण ठरवण्यासाठी या शिबिरात विचारमंथन करण्यात येइल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली.


पक्षाचा नवसंकल्प -शिर्डीत 18 व 19 जानेवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या नवसंकल्प शिबिराच्या पूर्व संध्येला तटकरे यांनी पत्रकार परिषदेत अधिवेशनाबाबतची भूमिका विषद केली. यावेळी रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, संग्राम कोते, कपील पवार, दीपक गोंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या अधिवेशनासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, मंत्री धनंजय मुंडे, आजी माजी आमदार, खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ही तर पक्षांतर्गत बाब -छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, भुजबळ पक्षाचे ज्येष्ठ नेते, संस्थापक अध्यक्ष आहेत. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा आहे. त्यांना मी व्यक्तीश: विनंती केलेली आहे. ते नक्की अधिवेशनात सहभागी होतील. त्यांच्या मंत्रिपदाबाबचा विषय ही पक्षांतर्गत बाब असल्याचं ते म्हणाले.

सदस्य नोंदणी अभियान -पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी राज्यभरात एका ठराविक कालावधीत सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात अधिवेशनातून करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांबरोबरच कृषी धोरण, वातावरणीय बदल आदीबाबतही चर्चा होईल. विविध राजकीय विश्लेकांनाही या अधिवेशनात व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.


पक्ष बॅकफुटवर -बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यांच्यामुळे पक्ष बॅकफुटवर आला का, यावर त्यांनी बीडची घटना गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याचा मास्टरमाईंड शोधला जाईल, पोलिसांकडून या प्रकरणाची उकल करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पालकमंत्री नियुक्ती येत्या एकदोन दिवसांत होवू शकते. तिन्ही पक्ष एकत्रित बसून त्यावर निर्णय घेतली. ही बाब सरकारशी निगडीत आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.



पक्षाचे मागचे अधिवेशन शिर्डीत झाले, त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्रित होते. त्याच शिर्डीत आता अधिवेशन घेताना काय वाटते यावर ते म्हणाले, 99 पासूनच्या आठवणी आहेत, पण पक्षात कृतीला, विचाराला महत्व असते. भाजपाबरोबर जाण्यासाठी आमचा 2014 पासून प्रयत्न होता. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत आरोप करणारे महाविकास आघाडीचे नेते अद्याप विधानसभेच्या पराभवाच्या नैराश्येतून बाहेर पडलेले नसल्याची टीका तटकरे यांनी केली.

यावेळी अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहिले आहेत. त्यांना पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की, प्रफुल पटेल यांच्या विनंतीवरुन आपण अधिवेशनाला उपस्थित राहिलो आहे. तसंच अजित पवार यांनी आपल्याशी संपर्क साधला नसल्याचं भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच पक्षाचा कोणताही प्रस्ताव अजूनही आपल्यापुढे नसल्याचं ही भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा..

  1. सुनिल तटकरे म्हणाले, योग्य वेळी छगन भुजबळांची भेट घेऊ : छगन भुजबळांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना भरला दम
  2. महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडी ? : शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न, आरोप प्रत्यारोपावरुन रंगलं राजकारण
Last Updated : Jan 18, 2025, 12:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details