पुणे Yerwada Jail : पुण्यातील येरवडा कारागृहात नेहमीच अनेक सामाजिक तसंच समाजपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. अशातच आता येरवडा कारागृहात बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बंदीनी सहभाग घेत बुद्धिबळ स्पर्धेत आपला डाव टाकला. भारतातील अग्रगण्य ऊर्जा उत्पादक कंपनी इंडीयन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या तसंच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेचं आयोजन 19 ते 21 जून दरम्यान पुण्यात करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत येरवडा कारागृहात या सांघिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
अनेक खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग : पुण्यातील येरवडा कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत 10 पुरुष बंदीवान तर 10 महिला बंदीवान यांनी सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे जगातील तसंच भारतातील बुद्धिबळ खेळाळूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यात ईशा करोडे, सौम्य स्वामिनाथन्, अनिर्वन बी या खेळाडूंनी या बंदीवांनांबरोबर बुद्धिबळ खेळून आपला डाव टाकला. या स्पर्धेत काही बंदींनी आपला डाव टाकत सामना जिंकला तर काही पराभूत झाले.
स्पर्धा जिंकणाऱ्याला 120 दिवस पॅरोल : याविषयी बोलताना अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेला आजपासून सुरवात होत आहे. यात बंदिवान हे आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळत आहेत. मागच्या वर्षी एक पाऊल म्हणून आम्ही बंदीवानांसाठी बुद्धिबळ खेळाला सुरवात केली होती. आता एका वर्षातच परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. सुरवातीला या बंदींना बुद्धिबळाबाबत काहीच माहीत नव्हतं, पण त्यांच्याकडून रोज 4 ते 5 तास तयारी करुन मागच्याच वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे." तसंच विशेष बाब म्हणजे स्पर्धेत जिंकणाऱ्या बंदीला 120 दिवस पॅरोल दिला जातो, असं यावेळी गुप्ता म्हणाले. तसंच आम्हाला कैद्यांना बाहेर पडल्यावर पुन्हा समाजात चांगल्या पद्धतीनं समोर आणायचं आहे. बाहेर राहणाऱ्या खेळाडूला जे जमणार नाही ते आमच्या खेळाडूंनी करुन दाखवलं आहे. सुधारणा आणि पुनर्वसन हे जेल प्रशासनाचं ब्रीदवाक्य या कैद्यांनी खरं करुन दाखवलं. सध्या येरवडा कारागृहात पुरुष आणि महिला असे एकूण 200 कैदी बुद्धिबळ शिकत आहेत, असं यावेळी गुप्ता म्हणाले.