नांदेड/नागपूर : जिल्ह्यातील विविध महसुली कामानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती खुद्द जयंत पाटील यांनी दिली. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. जयंत पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. त्यावर राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा करत म्हणाले की, "ही भेट केवळ सांगली जिल्ह्यातील विविध महसुली कामासाठी होती." यावर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. होय... जयंत पाटील मला भेटले, पण राजकीय चर्चा आमच्यात झाली नसल्याचं बावनकुळे म्हणाले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीवर जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण :"सोमवारी सायंकाळी बावनकुळे यांची मुंबई इथल्या घरी भेट घेतली. सांगली जिल्ह्यातील विविध महसूल प्रश्नांवर त्यांना निवेदनं दिलं. फक्त निवेदनं देण्यासाठी ही भेट होती. महसूल विभागात सातबाराचं संगणीकरण केलं, ही प्रक्रिया ऑनलाईन केली. यात अनेक शेतकऱ्यांच्या दुरुस्त्या वेळेवर होत नाहीत. हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा आहे. याकडं त्यांचं लक्ष वेधलं. अनेक जमिनी एक्वायर झालेल्या आहेत, त्यावर नोटीसा देऊन शिक्के देखील मारलेले आहेत. परंतु, त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. असे जिल्ह्यातील बरेच प्रश्न घेऊन मी त्यांना भेटलो. सहाची वेळ ठरली होती. ही भेट 25 मिनिटं चालली. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील देखील उपस्थित होते. माझ्याबरोबर शिष्टमंडळ देखील होतं," अशी माहिती जयंत पाटील यांनी बावनकुळेंच्या भेटीवर दिली.