चंद्रपूर - मजुरीसाठी मध्य प्रदेशमधून आलेल्या मजुराला वाघानं हल्ला करून ( chandrapaur Tiger attacks ) ठार केलं. लालसिंग बरेलाल मडावी असे मृत मजुराचं नाव आहे. वाघ चाल करून येत असल्यानं मजुराचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठीदेखील वनविभागाच्या पथकाला प्रचंड प्रयत्न करावे लागले.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बल्लारपूर वनपरिक्षेत्रात सध्या बांबू कटाईचे काम सुरू आहे. याचे कंत्राट नगिन पुगलिया या व्यक्तीला देण्यात आलं. त्या अंतर्गत वनखंड क्रमांक 493 येथे मंगळवारी (ता. 14) सकाळी मजुरांच्या मदतीनं जंगलात बांबू कटाईचं काम सुरू होते. यात मध्यप्रदेश येथून आलेले लालसिंग बरेलाल मडावी (वय, 57) यांचाही समावेश होता. लालसिंग हे मध्यप्रदेश राज्यातील मणिकपुर माल (बेहराटोला) तह. बिछाया, जि. मंडला येथील रहिवासी होते. ते बांबू कटाई करत असताना वाघ त्यांच्यावर दबा धरून लपून बसला होता. अशातच अचानक वाघानं त्यांच्यावर झडप घातली. त्यांना काही समजण्यापूर्वीच ठार केले. त्यावेळी उपस्थित मजुरांनी आरडाओरडा केला. मात्र, तोवर वाघ मजुराला जंगलात घेऊन गेला. याबाबतची माहिती घटनास्थळी मजुराकडून वनविभागाला देण्यात आली.
वाघ मृतदेहाच्या बाजूला बसून राहीला-वाघानं मजुराला उचलून नेल्याची महिती मिळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. यावेळी मजुराचा वनविभागाच्या पथकाकडून शोध घेण्यात आला. घटनास्थळापासून काही अंतरावर मृतदेह मजुराचा मृतदेह दिसून आला. तर वाघ मृतदेहाच्या बाजूला ठाण मांडून बसला होता. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वाघ वनकर्मचाऱ्यांच्या दिशेने चाल करुन येत होता. काही तास वनविभागाचे कर्मचारी आणि वाघामध्ये हा थरार सुरू होता. अखेर सायंकाळी 4 वाजता वाघाला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं.