नागपूर Chamunda Blast Case:गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यात असलेल्या धमणा येथील चामुंडा या कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात कंपनीत काम करत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन कर्मचारी अत्यंत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यापैकी आणखी एका जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतकांची संख्या ही आठ झाली आहे. श्रद्धा पाटील, दानसा मरस्कोल्हे असं मृत्यू झालेल्या तरुणींचे नाव आहेत. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट देत सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून २५ लाख तर राज्य सरकारकडून १० लाख असे ३५ लाखांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले.
मृतकांमध्ये सहा महिलांचा समावेश: चामुंडा स्फोटक कंपनीत झालेल्या स्फोटात ७ कामगारांनी आपला जीव गमावला. त्यामध्ये ६ महिलांचा समावेश आहे. प्रांजली मोदरे, वैशाली क्षीरसागर, प्राची फलके, शीतल चटप, मोनाली अलोने अशी मृत झालेल्या पाच महिलांची नावं आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्व महिला या २० ते २५ वयोगटातील आहेत.