नवी दिल्ली/पुणे Pooja Khedkar Discharges From IAS : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली. पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेमधून बरखास्त करण्यात आलं. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या 'डिमांड'मुळं त्या चर्चेत होत्या. याआधी UPSC नं देखील त्यांच्यावर कारवाई केली होती.
'या' कारणामुळं करण्यात आली कारवाई : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन आणि त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी 'यूपीएससी'कडूनही पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच 'यूपीएससी'नं त्यांची उमेदवारी रद्द केली होती. तसंच त्यांना यापुढं 'यूपीएससी'कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये बसता येणार नाही, असंही 'यूपीएससी'कडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
अपप्रवृत्तीचं विसर्जन झालं : पूजा खेडकर यांना सरकारी सेवेतून बरखास्त करण्यात आल्याची माहिती समोर येताच यासंदर्भात प्रतिक्रिया देत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले की, "केंद्र शासनानं प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना बडतर्फ केलं. पूजा खेडकर यांनी 'आयएएस' सेवेमध्ये येण्यासाठी जे काही केलं त्याला गुन्हा म्हणतात. आज गणरायांच्या आगमनाच्या दिवशीच या अपप्रवृत्तीचं विसर्जन झालं हे चांगलं झालं." कुंभार पुढे म्हणतात, "योग्य पाठपुरावा केला तर इतकं मोठं संरक्षण असणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील सेवेतून काढलं जाऊ शकतं हे या प्रकरणानं सिद्ध झालं. आता इतर सनदी अधिकारी जे शासनाची फसवणूक करून देखील अद्यापही सेवेत आहेत त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जावी ही अपेक्षा." पूजा खेडकर प्रकरण सर्वप्रथम विजय कुंभार यांनीच समोर आणलं होतं.