मुंबई CBI Raid On Passport Seva Kendra : खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करुन देण्यासाठी सहाय्य करण्याच्या आरोपावरुन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) ने शनिवारी मुंबई आणि नाशिकमधील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांशी संबंधित ३३ ठिकाणी छापेमारी केली. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर ३२ जणांविरोधात १२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये लोअर परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रात (पीएसके) कार्यरत असलेल्या पासपोर्ट सहाय्यक, वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यकांचा समावेश आहे. पासपोर्टसाठी केलेल्या अर्जातील त्रुटींकडं दुर्लक्ष करुन नियमांना बगल देत पासपोर्ट तयार करण्याचं काम या माध्यमातून केल्याचा आरोप करण्यात आलाय.
बेकायदा पध्दतीनं केली मदत :मुंबईतील पासपोर्ट सेवा केंद्रात कार्यरत असलेले हे अधिकारी पासपोर्ट फॅसिलिटेशन मध्यस्थांशी थेट संपर्कात होते. या मध्यस्थांच्या मार्फत करण्यात आलेल्या विविध अर्जदारांना त्यांची कागदपत्रे पूर्ण नसताना, बोगस कागदपत्रे जोडलेली असताना तसंच अर्जामध्ये पासपोर्ट धारकांच्या व्यक्तिगत माहितीसोबत छेडछाड केलेली असताना देखील पासपोर्ट देण्यात आले. निकष पूर्ण न करणाऱ्या अनेक अर्जदारांना याद्वारे बेकायदा पध्दतीनं मदत करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अशा १८ पासपोर्ट फॅसिलिटेशन मध्यस्थांबाबत आलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.