नागपूर CBI raid On NEERI :सीबीआयच्या पथकानं आज 'नीरी' म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (National Environmental Engineering Research Institute) छापा टाकला. सकाळी आकराच्या सुमारास सीबीआयचं एक विशेष पथक नीरीमध्ये दाखल झालं. त्यांनी काही कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली. बनावट कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निधीचा अपहार झाल्याच्या अनुषंगानं काही तक्रारी सीबीआयकडं आल्या होत्या. त्या आधारेचं आज सीबीआयच्या पथकानं चौकशी सुरू केली असल्याची माहिती पुढं आली आहे. खासगी कंपन्यांना निरीनं अनुकूल अहवाल दिल्याची तक्रार सीबीआयला मिळाली होती. या प्रकरणी माहिती घेण्यासाठी सीबीआय पथकानं आज 'नीरी'मध्ये चौकशी केली.
तत्कालीन संचालकासह 10 जणांवर गुन्हे दाखल : सीबीआयनं आज राष्ट्रीय पर्यावरण, अभियांत्रिकी संशोधन संस्थामध्ये केलेल्या कारवाई प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. त्यामध्ये एकूण 10 जणांना आरोपी केलं आहे.आरोपींमध्ये नीरीचे तत्कालीन संचालक राकेश कुमार यांच्यासह चार शास्त्रज्ञ, पाच खासगी कंपन्यांचा समावेश आहे. या सर्वांवर निरीच्या वेगवेगळ्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात सीबीआयला काही तक्रारी मिळाल्या होत्या. त्या आधारावर सीबीआयनं नागपूर महाराष्ट्रसह देशातील वेगवेगळ्या चार राज्यात एकूण 17 ठिकाणांवर छापे टाकले.