पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी 10 मे 2024 रोजी पुरेशा पुराव्याअभावी पुणे सत्र न्यायालयानं तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर 100 दिवस उलटू गेल्यानंतरही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलेलं नाही. त्यामुळं उच्च न्यायालयात तातडीनं अपील दाखल करण्याची मागणी दाभोलकर कुटुंबीय तसंच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं शनिवारी केलीय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यास सीबीआयची अक्षम्य दिरंगाई - Narendra Dabholkar murder case - NARENDRA DABHOLKAR MURDER CASE
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुरेशा पुराव्याअभावी पुणे सत्र न्यायालयानं तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय. मात्र, या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलेलं नाही. त्यामुळं सीबीआयनं सुटकेविरोधात तातडीनं अपील दाखल करावं, अशी मागणी दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी केलीय.
Published : Aug 17, 2024, 10:27 PM IST
सीबीआयकडून अक्षम्य दिरंगाई :या गुन्ह्यात या आरोपींचा सहभाग असल्याचा वाजवी संशय आहे. परंतु पुराव्याअभावी गुन्ह्यात त्यांचा सहभाग सीबीआयला सिद्ध करता आलेला नाही. तसंच त्यांनी त्यांच्याविरोधात अद्याप अपील दाखल केलेलं नाही. सत्र न्यायालयाच्या निकालाकडं लक्ष वेधण्यासाठी सीबीआयच्या महासंचालकांना दाभोलकर कुटुंबीयांनी निवेदन पाठवलं आहे. त्याला अद्याप सीबीआयकडून प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात डॉ. दाभोलकर यांच्या पीडित कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत हमीद दाभोलकर यांनी सीबीआयवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच सीबीआयकडून अक्षम्य दिरंगाई होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आयोजित विविध कार्यक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. यामध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनानिमित्त पुण्यात सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध गीतकार तसंच स्टँड-अप कॉमेडियन वरुण ग्रोव्हर यांच्या जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिज्ञासा में जीवन’ या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. तसंच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉ. दाभोलकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित विविध लेखन 15 पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित करणार आहे. ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांच्या हस्ते या पंधरा पुस्तकांचं प्रकाशन करण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानातून मंजूर झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्यासारखा कायदा राष्ट्रीय पातळीवर मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्रातील खासदारांना करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खासदारांना ठिकठिकाणी भेटून निवेदन देणार आहेत.