महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 10:37 AM IST

ETV Bharat / state

मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी; गुरांना चारा, पाणी मिळावं यासाठी सहा महिन्यासाठी केलं होतं स्थलांतर - CATTLE OWNERS RETURNED IN MELGHAT

Amravati News : गुरांना चारा आणि पाणी मिळावं यासाठी गवळी समाज बांधव सहा महिन्यांसाठी स्थलांतरित झाले होते. मात्र, पावसाची चाहूल लागताच या गवळी समाज बांधवांनी आता घरवापसी केली आहे.

Cattle Owners returned in Melghat due to rainy season
मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी (Source reporter)

अमरावती Amravati News :सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधवांसोबतच मोठ्या संख्येनं गवळी समाज खूप काळापासून राहतोय. विशेष म्हणजे मेळघाटातील दुर्गम भागात शेतीसह गायी आणि म्हशींचं पालन हा गवळी बांधवांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, उन्हाळ्यात गुरांची गैरसोय होत असल्यानं त्यांनी जानेवारी महिन्यात स्थलांतर केलं होतं. त्यानंतर आता पावसाची चाहूल लागताच गवळी बांधव पुन्हा एकदा आपल्या गावी परतले आहेत.

मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी (Source reporter)


उंच डोंगरांवर पाणीच नाही : मेळघाटातील अनेक गावं उंच डोंगरांवर वसलेली आहेत. मेळघाटच्या पायथ्याशी पाणीटंचाई असताना उंच डोंगरांवर कुठंच पाणी आढळत नाही. पाणी नसल्यामुळं उन्हाळ्यात मेळघाटचे जंगल अगदी रुक्ष होऊन जातं. अशा परिस्थितीत जनावरांचे हाल होऊ नये, यासाठी मेळघाटात मोठ्या संख्येनं असणारा गवळी समाज हा मेळघाटच्या बाहेर आपल्या जनावरांसह स्थलांतरित होतो.

'या' भागात करतात मुक्काम : मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्यातील सर्वच दुर्गम गावांमध्ये गवळी समाज अनेक काळापासून वसलाय. व्याघ्र प्रकल्पानं मेळघाटच्या जंगलात जनावरांना चराईसाठी अतिशय चाचक अटी लावल्यामुळं मर्यादित क्षेत्रातच गवळी समाजाला आपली जनावरे चरावी लागतात. जून ते डिसेंबर महिन्यापर्यंत मेळघाटातील नदी, नाले, तलावांना पाणी राहतं. मात्र, त्यानंतर पुढचे सहा महिने या भागात मोठी पाणी टंचाई असते. अशा परिस्थितीत गवळी बांधव सातपुडा पर्वत खाली उतरून मेळघाटच्या बाहेर अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, सुर्जी या तालुक्यात विविध ठिकाणी आपल्या जनावरांसह मिळेल त्या ठिकाणी राहायला येतात. पण आता पावसाळ्याची चाहूल लागल्यामुळं आम्ही आमच्या गावी परतलो आहोत, असं खांबला येथील रहिवासी किशोर अखंडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. तसंच जनावरांना पाणी आणि चारा मिळावा यासाठी दरवर्षी आम्हाला गाव सोडून जावं लागतं, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मेळघाटात मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन : मेळघाटच्या जंगलात चांगला चारा मिळत असल्यानं या भागातील गवळी समाजाची जनावरही अतिशय धष्टपुष्ट राहतात. मेळघाटातील खवा देखील प्रसिद्ध असून दूध उत्पादनाच्या माध्यमातून गवळी समाज मेळघाटात बऱ्यापैकी सदन झालाय. मात्र, असं असलं तरी उन्हाळ्यात अनेक गावातील गवळी बांधवांना आपल्या जनावरांसह मेळघाटच्या बाहेर भटकंती करावी लागते.

हेही वाचा -

  1. मेळघाटातील 'मडकी' रिकामी! हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण - Amravati Water Scarcity
  2. मेळघाटात चक्क आंब्याचं गाव! आंब्यानं बहरला आमझरी परिसर, काय आहेत गावाची वैशिष्ट्ये - Mango Village
  3. अमरावतीत 400 वर्ष जुने औषधी गुणयुक्त गोरखचिंचेचं झाड, मूळच्या आफ्रिकेतील या वृक्षाला असतं दीड ते दोन हजार वर्ष आयुष्य - Gorakhchinch tree

ABOUT THE AUTHOR

...view details