महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! राज्यातील 23 मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल, अजित पवारांवर सर्वाधिक गुन्हे - MINISTERS WITH CRIMINAL CASES

मंत्रिमंडळात 36 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्री असणार आहेत. असं असतानाही मंत्रिमंडळ विस्तारातील अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती एडीआरनं दिलीय.

mahayuti leaders
महायुतीचे नेते (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2024, 7:46 PM IST

मुंबई-हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानं आता सगळ्यांना खाते वाटपाची प्रतीक्षा आहे. रविवारी 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असून, यात महायुतीतील 39 मंत्र्यांनी शपथ घेतली असून, त्यात भाजपाच्या 19 मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनाही शपथ देण्यात आलीय. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली असली तरी छगन भुजबळांना संधी न दिल्यानं त्याचा महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात 36 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्री असणार आहेत. असं असतानाही मंत्रिमंडळ विस्तारातील अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स(ADR)नं दिलीय.

लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री :महायुतीतील 42 मंत्र्यांपैकी 26 मंत्र्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेत. तसेच त्यातील 17 मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अजित पवारांविरोधात 40 गुन्हे दाखल असून, त्यापाठोपाठ नितेश राणेंविरोधात 38 गुन्हे दाखल झालेले आहेत. भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री असून, त्यांची एकूण संपत्ती 447 कोटी 9 लाख रुपये इतकी आहे. त्यानंतर शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा नंबर असून, त्यांची संपत्ती 333 कोटी 32 लाख रुपये इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले असून, त्यांची संपत्ती 128 कोटी 41 लाख रुपये इतकी आहे, तर शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे सर्वात गरीब मंत्री असून, त्यांची संपत्ती 1 कोटी 60 लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील 13 मंत्र्यांचं शिक्षण फक्त 8 वी ते 12 वीपर्यंत झालेलं असून, 25 मंत्री 12 वीहून अधिक शिकलेले आहेत.

गणेश नाईक सर्वात ज्येष्ठ मंत्री : दरम्यान, 4 मंत्री हे पदवीधारक आहेत. भरत गोगावले हे फक्त आठवी पास असून, ते सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी ते गेल्या सरकारच्या काळापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. त्यावेळी शिंदेंनी त्यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण केली होती. तसेच 13 मंत्र्यांनी त्यांचं वय 31 ते 50 वर्षांपर्यंत घोषित केलेलं असून, 29 मंत्री हे 51 ते 80 वयोमर्यादेचे आहेत. मंत्रिमंडळात 16 मंत्री 60 पार केलेले असून, भाजपाचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांचं वय 74 असून, ते सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. तसेच अजित पवार गटाच्या 36 वर्षीय अदिती तटकरे सर्वात तरुण मंत्री आहेत. अदिती तटकरे यांची मंत्रिपदाची दुसरी टर्म आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 4 महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. महायुती मंत्रिमंडळात 9 वकील मंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील असून, त्यांच्याशिवाय 8 जणांनी वकिलीची पदवी घेतलीय. पंकज भोयर हे डॉक्टरेट मिळवलेले एकमेव मंत्री आहेत.

हेही वाचाः

ABOUT THE AUTHOR

...view details