अमरावती :उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे यती स्वामी नरसिंह महाराज यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अल्पसंख्याक समुदायातील काही व्यक्तींनी शुक्रवारी दुपारी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी सायंकाळी या प्रकरणात गुन्हा नोंदवला होता. असं असताना आपल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही, अशी अफवा पसरवून वीस ते पंचवीस जणांचा मोठा जमाव पोलीस ठाण्याच्या परिसरात एकत्र आला. पोलिसांना काही कळायच्या आतच पोलीस ठाण्यावर या जमावानं दगडफेक केली.
बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल : या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी एकाला अटक केली, तर शनिवारी सकाळी आठ जणांना ताब्यात घेतलं. शनिवारी दुपारी देखील पठाण चौक, लालखडी आदी भागात दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मोहीम पोलिसांनी राबवली. एकूण 26 जण या प्रकरणात मुख्य आरोपी असून, बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुख्य आरोपीला होणार लवकरच अटक : नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक झाल्यानंतर पोलीस उपायुक्त सागर पाटील हे पोलीस ठाण्यातच ठाण मांडून आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी हा सय्यद जुबेर असून, त्याला लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत पोलिसांच्या एकूण दहा गाड्यांची तोडफोड झाल्याची माहिती, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. तर या घटनेत जवळपास 21 पोलीस जखमी झाले आहेत.