नागपूर Case Registered Against 11 Doctors : रुग्णाच्या उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत न्यायालयाच्या आदेशानं नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 11 डॉक्टरांवर अजनी पोलीस ठाण्यात कलम 201, 202, 304-अ आणि 34 अन्वये गुन्हा दाखल झाल्यानं वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण 2019 चं असून तक्रारदारानं, त्याच्या पत्नीचा मृत्यू उपचारात डॉक्टरांनी हयगय केल्यामुळं झाल्याचा आरोप केला होता. तसंच पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर देखील डॉक्टरांनी ही बाब लपवून ठेवली होती, असंही तक्रारदारानं आपल्या तक्रारीत म्हटलंय.
नेमकं प्रकरण काय? : केवलराम पांडुरंग पटोले असं तक्रारदाराचं नाव असून जिल्हा न्यायालयाच्या अधीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. पटोले यांची पत्नी पुष्पा यांच्या मानेवर गाठ होती. उपचारासाठी त्यांनी डॉ. राज गजभिये यांना दाखविले असता त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि रुग्णालयात दाखल करून घेतलं. 6 जुलै 2019 ला पुष्पा पटोले यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्यानंतर त्यांची तब्येत अचानक गंभीर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर नातेवाईकांना भेटू सुध्दा दिलं नाही. त्यानंतर तब्बल दोन दिवसानंतर देखील डॉक्टर पुष्पा यांच्या प्रकृतीबद्दल काहीचं सांगत नसल्यानं केवलराम पटोले यांनी 8 जुलै ला पत्नीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी तयारी केली. तेव्हा पुष्पा यांचा मृत्यू झाला असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. शस्त्रक्रियेदरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला होता. मात्र, आपला निष्काळजीपणा लपवण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची बाब लपवली आणि जाणीवपूर्वक शवविच्छेदन सुद्धा होऊ दिलं नाही, असा आरोप केवलराम पटोले यांनी केला होता.