महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहिता भंग केल्याचा ठपका; सुहास कांदे, समीर भुजबळ यांच्या विरोधात गुन्हे दाखल

उमेदवारांमधील वाद, धक्काबुक्की प्रकरणी सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्त्यांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

case filed against Suhas Kande and Sameer Bhujbal along with 200 to 250 activists in Nashik Nandgaon Assembly Constituency
सुहास कांदे, समीर भुजबळ यांच्यात बाचाबाची (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2024, 11:55 AM IST

नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ, शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यासह त्यांच्या 200 ते 250 कार्यकर्त्यांविरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांमधील वाद प्रकरणी एक गुन्हा, समर्थकांची धक्काबुक्की प्रकरणी चार गुन्हे, वाहनात पैसे आढळल्याप्रकरणी दोन गुन्हे, तर गाडीत मद्याच्या बाटल्या सापडल्या प्रकरणी एक गुन्हा, असे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदगाव नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक बाबासाहेब शिंदे यांच्या तक्रारीनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? : नांदगाव मतदारसंघात मतदानाच्या दिवशी बाहेरुन लोक आणल्याच्या मुद्द्यावरुन सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात संघर्ष झाला. समीर यांनी आपली वाहनं रस्त्यात आडवी लावून बाहेरुन आलेल्या लोकांची वाहनं काहीवेळ रोखून धरल्यानं कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला. यावेळी कांदे यांनी भुजबळ यांच्या अंगावर धावून जात 'तुझा आज मर्डर फिक्स आहे' अशी धमकी दिल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं. तर दुसरीकडं, मतदानासाठी बाहेरुन आलेल्या स्थानिक ऊसतोड कामगारांना भुजबळांनी जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोप कांदे यांनी केला होता.


कोण आहेत सुहास कांदे? : 2019 च्या शपथपत्रात सुहास कांदे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. 2014 ला त्यांच्यावर तडीपारीची कारवाईही झाली होती. फसवणूक, खंडणी, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. 2006 मध्ये मनसेतून कांदे यांनी राजकारणाला सुरुवात केली. नंतर 2008 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी नांदगाव मधून पंकज भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत पुन्हा पंकज भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि जिंकली. सुहास कांदे यांचं राजकारण हे भुजबळांसोबतच्या संघर्षामुळं चांगलंच गाजलं. भुजबळांचे कट्टर विरोधक म्हणून कांदे यांची ओळख आहे.

हेही वाचा -

  1. आम्ही जॅकेट आणि हेल्मेट घालून फिरायचं का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
  2. इथं माझीच दहशत कायम राहणार : सुहास कांदेंची अजित पवारांच्या समन्वयकाला शिवीगाळ

ABOUT THE AUTHOR

...view details